मनसे पदाधिकार्याच्या नावाने बोगस फेसबुक अकाऊंट उघडले
सीआरपीएफचा कर्मचारी असल्याची बतावणी करुन फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० मार्च २०२४
मुंबई, – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चारकोप विधानसभेचे विभाग अध्यक्ष दिनेश अनंत साळवी यांच्या नावाने अज्ञात सायबर ठगाने बोगस अकाऊंट उघडून तो सीआरपीएफच्या कर्मचार्याचा मित्र असल्याची बतावणी करुन फर्निचरसह इतर घरगुती सामानाची विक्रीच्या बहाण्याने फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिनेश साळवी यांच्या तक्रारीवरुन चारकोप पोलिसांनी आशिषकुमार नाव सांगणार्या अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिनेश साळवी हे कांदिवलीतील चारकोप परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चारकोप विधानसभा विभाग अध्यक्ष आहेत. त्यांचा एक फेसबुक अकाऊंट असून गेल्या पंधरा वर्षांपासून ते त्यांच्या अकाऊंटमधून त्यांच्या सामाजिक कार्याची पोस्ट करतात. १० ऑक्टोंबर २०२३ रोजी त्यांच्याच अकाऊंटसारखा दिसणारा अन्य एक फेसबुक अकाऊंट उघडून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मित्रांना फे्रंड रिक्वेस्ट पाठविली होती. त्यांच्याकडे पैशांची मागणी करुन त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. संबंधित फेसबुक अकाऊंटवरील आशिषकुमार नाव सांगणार्या व्यक्तीने तो त्यांचा मित्र असून सीआरपीएफमध्ये कामाला आहे. त्याची बदली झाल्याने त्याच्या घरातील फर्निचरसह इतर सामानाची स्वस्तात विक्री करत असल्याची माहिती दिली होती. यावेळी त्याने स्वतचा एक मोबाईल क्रमांक दिला होता. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने दिनेश साळवी यांच्या अनेक मित्रांनी त्यांच्याकडे विचारणा केली होती. यावेळी त्यांना त्यांच्या नावाचा दुसरा बोगस फेसबुक अकाऊंट सुरु करुन अज्ञात व्यक्तीनी फसवणुक करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले होते. या प्रकराने त्यांना धक्काच बसला होता.
९ मार्चला त्यांच्या परिचित दिलीप पुंजाजी पाटील आणि शकील यांना आशिषकुमार याने अशाच प्रकारे एक मॅसेज पाठवून त्यांना त्याच्या बँक खात्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी संबंधित बँक खात्यात तीस हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. या दोघांकडून ही माहिती समजताच दिनेश साळवी यांनी चारकोप पोलिसांत आशिषकुमार या व्यक्तीविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी आशिषकुमार या व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.