दागिन्यांच्या मोबदल्यात बोगस बिस्कीट देऊन फसवणुक
हैद्राबादच्या ज्वेलर्स मालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ जानेवारी २०२४
मुंबई, – सोन्याच्या दागिन्यांच्या मोबदल्यात बोगस सोन्याचे बिस्कीट देऊन बोरिवलीतील एका ज्वेलर्स व्यापार्याची एक कोटी साठ लाख रुपयांचे २२ कॅरेटचे २०४५ ग्रॅम वजनाच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा प्रकार काळबादेवी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हैद्राबादच्या ज्वेलर्स मालकासह दोघांविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. रुपेश रुपदास वैष्णव आणि रामलाल गुर्जर अशी या दोघांची नावे असून ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
अजय धरमजी वाया हे बोरिवली परिसरात राहत असून त्यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांची क्रिशा आर्ट नावाची कंपनी असून या कंपनीचे मुख्य कार्यालय बोरिवलीतील प्रेमनगर, केवलनगर इमारतीमध्ये आहे. याच ठिकाणी त्यांचा माळ आणि मंगळसूत्र बनविण्याचे एक युनिट आहे. माळ आणि मंगळसूत्र बनविण्यासाठी त्यांना तार लागत असल्याने ते तार पाट्याचा व्यवसाय करणारे सुरेश वैष्णव यांच्याकडून काम करुन घेत होते. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत हैद्राबादचे मयुरा ज्वेलर्सचे मालक रामलाल गुर्जर यांच्याविषयी त्यांना माहिती दिली होती. त्यांचा हैद्राबाद येथे सोने दागिने विक्रीचा व्यवसाय असून त्यांना काही सोन्याच्या दागिन्यांची गरज आहे. त्यांच्याशी व्यवहार केल्यास त्यांना चांगला फायदा होईल असे सांगितले. त्यानंतर रामलालने त्यांना काही दागिन्यांचे सॅम्पल पाठविले होते. या सॅम्पलप्रमाणे त्यांनी काही सोन्याचे दागिने बनवून त्यांना पाठवून दिले होते. ते दागिने पसंद पडल्याने त्यांनी त्यांना सोन्याच्या दागिन्यांची ऑर्डर दिली होती. ठरल्याप्रमाणे २१ ऑक्टोंबरला त्यांनी रामलालला आठशे आणि एक किलो वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पाठविले होते. ते दागिने त्यांच्याकडून रुपेश वैष्णव घेऊन जात होता. या सोन्याच्या मोबदल्यात रामलालने त्यांना सोन्याचे बार देण्याचे आश्वासन दिले होते.
दागिने दिल्यानंतर त्याने काही दिवसांत त्यांना सोन्याचे बार पाठवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. २५ डिसेंबरला रामलालने त्यांना आणखीन काही सोन्याच्या दागिन्यांची ऑर्डर दिली होती. त्यामुळे त्यांनी रुपेशमार्फत रामलाल एक कोटी साठ लाख रुपयांचे २२ कॅरेटचे २०४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दिले होते. हा संपूर्ण व्यवहार काळबादेवी येथील आदर्श बाग हॉटेलमध्ये झाला होता. या दागिन्यांच्या मोबदल्यात रामलालने रुपेशला दोन किलो वजनाचे सोन्याचे बिस्कीट दिले होते. रुपेशकडून सोन्याचे बिस्कीट प्राप्त होताच त्यांनी सोन्याची शुद्धता तपासली असता ते बिस्कीट बोगस होते. त्यामुळे त्यांनी रुपेश आणि रामलालला संपर्क साधून हॉटेलमध्ये येत असल्याचे सांगितले. मात्र ते हॉटेलमध्ये नव्हते. त्यांनी त्यांचे मोबाईल बंद ठेवले होते. सुरेश आणि रामलाल यांनी संगनमत करुन सोन्याचे दागिन्याच्या मोबदल्यात बोगस सोन्याचे बिस्कीट देऊन अजय वाया यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून रुपेश आणि रामलाल यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.