सोन्याचे मुलामा असलेले चांदीचे बिस्कीट देऊन फसवणुक
चेन्नईच्या व्यापार्याच्या तक्रारीवरुन दोन भामट्याविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ मे २०२४
मुंबई, – सोन्याचे मुलामा असलेली चांदीचे बिस्कीट देऊन एका चेन्नईच्या व्यापार्याची दोन भामट्यांनी फसवणुक केल्याची घटना चेंबूर परिसरात उघडकीस आले आहे. याप्रकरणी मनिष आणि दिनेश नाव सांगणार्या दोन्ही भामट्यांविरुद्ध चेंबूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला आहे.
लोकेश कुपय्या भागवथर हे मूळचे तामिळनाडूच्या चेन्नईचे रहिवाशी असून तिथेच ते त्यांची पत्नी हेमा आणि दोन मुलांसोबत राहतात. त्यांचा आशिका सुरुथी फॅब्रिक्स नावाचे कपड्याचे दुकान आहे. सोन्याच्या व्यवसायाची आवड असल्याने ते नेहमी सोन्याचे बिस्कीट खरेदीसाठी ऑनलाईन सर्च करतात. यावेळी त्यांना मनिष नावाच्या एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक सापडला होता. त्याने त्याच्याकडे सोन्याचे बिस्कीट असून त्याला ते बिस्कीट स्वस्तात देण्याचे आमिष दाखविले होते. हा सौदा मुंबईत होणार असल्याने ते रविवारी १२ मेला चेन्नईहून मुंबईत आले होते. त्यांच्या वडिलांचे मित्र पट्टाबीरामण हे चेंबूर येथे राहत असून ते त्यांच्या घरी थांबले होते. १३ मेला त्यांची चेंबूर येथील आदर्श हॉटेलमध्ये मनिषची भेट झाली होती. यावेळी मनिषसोबत त्याचा मित्र दिनेश होता. त्याने दिनेशकडे सोन्याचे बिस्कीट असल्याचे सांगून त्यांना काही सोन्याचे बिस्कीट दाखविले होते. ते बिस्कीट सोन्याचे असल्याचे समजून त्यांनी ते बिस्कटी खरेदीचा निर्णय घेतला होता. मात्र दिनेशने त्यांना कॅश स्वरुपात बारा लाख रुपये देण्यास सांगितले. ही कॅश जमा करण्यासाठी त्याने त्यांच्याकडे दोन दिवसांची मुदत मागून घेतली होती.
दोन दिवसांनी पैशांची व्यवस्था झाल्याने ते तिघेही पुन्हा चेंबूर येथील मुक्तानंद शाळेजवळील संजय ज्यूस सेंटरमध्ये भेटले होते. तिथेच त्यांनी दिनेशला बारा लाख रुपये दिले. त्यानंतर त्याने त्यांना शंभर ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे बिस्कीट दिले होते. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ते तिघेही निघून गेले होते. काही वेळानंतर त्यांनी ते बिस्कीटची पाहणी केली असता त्यांना संशय निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी श्री साई कॉम्युटर टेस्टींगमध्ये बिस्कीटची तपासणी केली होती. यावेळी त्यांना ती बिस्कीट सोन्याऐवजी चांदीचे असल्याचे समजले. सोन्याचे बिस्कीट देतो असे सांगून मनिष आणि दिनेशने त्यांना चांदीचे बिस्कीट देऊन त्यांच्याकडून घेतलेल्या बारा लाखांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी चेंबूर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून मनिष आणि दिनेश नाव सांगणार्या दोन्ही भामट्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.