बोगस दागिने देऊन खरे दागिने घेऊन दोन महिलांचे पलायन
सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळालेल्या महिलांचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – जुन्या सोन्याच्या दागिन्यांच्या मोबदल्यात नवीन सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा बहाणा करुन दोन महिलांनी बोगस दागिने देऊन एका ज्वेलर्स मॅनेजरची सुमारे साडेनऊ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार दहिसर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पळून गेलेल्या दोन्ही महिलांविरुद्ध दहिसर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला आहे. शॉपसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन महिलांची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भावेश मदनलाल जैन हे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत मिरारोड येथे राहतात. दहिसर येथील शांतीवन, धर्मा पॅलेस इमारतीमध्ये पालखी ज्वेलर्स नावाचे एक शॉप असून याच शॉपमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. 12 ऑक्टोंबरला सकाळी साडेअकरा वाजता ते शॉपमध्ये काम करत होते. याच दरम्यान तिथे दोन महिला एका बाळाला घेऊन सोन्याचे दागिने खरेदीसाठी आले होते. यावेळी एका महिलेने तिचे लग्न असल्याचे सांगून त्यांच्याकडील जुने दागिने विकून नवीन दागिने खरेदी करायचे असल्याचे सांगितले. जुने दागिने घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे बिलाची मागणी केली, मात्र त्यांनी त्यांच्याकडे बिल नसल्याचे सांगितले.
या दोन्ही महिलांनी त्यांना चार सोन्याची चैन, एक ब्रेसलेट, एक सोन्याच्या कानातले जोड असे 188 ग्रॅम वजनाचे सोने दिले होते. त्यांच्याकडे सोने चेक करण्याचे मशिन नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या एका कर्मचार्याला प्रिंस एसेसिंग आणि हॉल मार्किंग सेंटरला पाठविले होते. काही वेळानंतर त्यांचे कर्मचारी सोन्याचे प्रमाणपत्र घेऊन शॉपमध्ये आले होते. काही वेळानंतर त्यांनी त्यांना साडेनऊ लाखांचे 113 ग्रॅम वजनाचे सोन्याचे, 125 चांदीचे दागिने आणि एक लाख रुपये कॅश दिले होते. काही वेळानंतर त्या दोन्ही महिला शॉपमधून निघून गेले. सोमवारी 13 ऑक्टोंबरला सकाळी साडेदहा वाजता भावेश जैन हे शॉपमध्ये आले होते. यावेळी त्यांनी दोन्ही महिलांनी दिलेले सोने वितळून त्याची लगडी करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना ते दागिने सोन्याचे नसून तांब्याच्या धातूचे असल्याचे दिसून आले.
या दोन्ही महिलांनी बोगस दागिने घेऊन त्यांच्याकडून खरे सोन्याचे दागिने तसेच एक कॅश असा साडेनऊ लाखांचा मुद्देमाल घेऊन पलायन केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पॅनकार्डवरुन त्यांचा शोध घेतला होता, मात्र त्या दोघीही कुठेही सापडल्या नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दहिसर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही महिलांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहाशिा केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध बोगस सोन्याचे दागिने देऊन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शॉपच्या सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपी महिलांचा शोध सुरु केला आहे.