बोगस सोन्याचे कॉईन देऊन ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक
2.30 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी दोन भामट्यांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2025
मुंबई, – शंभर ग्रॅम वजनाचे 25 बोगस सोन्याचे कॉईन देऊन ज्वेलर्स व्यापार्याकडून दोन कोटी तीस लाख रुपये घेऊन पळून गेलेल्या दोन भामट्यांना गुन्हा दाखल होताच काही तासांत डोंगरी पोलिसांनी अटक केली. अब्दुल रौफ मुसा आणि पामेश सुरेंद्र खिमावत अशी या दोघांची नावे आहेत. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. चांदीच्या कॉईनला मुलामा देऊन सोन्याचे कॉईन असल्याची बतावणी करुन ही फसवणुक केल्याचे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
नरेंद्र लाधुरामजी सोनी हे डोंगरीतील जेल रोड, मानेकिया अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय असून डोंगरी परिसरात सोनी लाधुभाई अॅण्ड सन्स ज्वेलरी नावाचे एक शॉप आहे. अब्दुल रौफ हा त्यांच्या परिचित असून तो त्यांच्या शॉपमधून अनेकदा सोन्याचे दागिने आणि चांदीचे कॉईन घेऊन गेला होता. 12 एप्रिलला तो त्यांच्या शॉपमध्ये आला होता. त्याने त्यांना त्याचा परिचित पामेश खिमावत याच्याकडे एका ज्वेलर्स कंपनीचे शंभर ग्रॅम वजनाचे 25 कॉईन आहे. ते कॉईन त्यांना स्वस्तात देण्याचे आश्वासन देत त्यांची पामेशसोबत ओळख करुन दिली होती.
12 एप्रिल ते 14 एप्रिलदरम्यान या दोघांनी त्यांना शंभर ग्रॅम वजनाचे 25 सोन्याचे कॉईन दिले होते.या कॉईनच्या बदल्यात त्यांच्याकडून दोन कोटी तीस लाख रुपये घेतले होते. सोमवारी 14 एप्रिलला त्यांनी कॉईनची पाहणी केली असता त्यात कॉईनबाबत संशय निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी कॉईन कापून पाहिला असता त्यात चांदी मिक्स केल्याचे दिसून आले. या दोघांनी बोगस कॉईन देऊन त्यांच्याकडून दोन कोटी तीस लाख रुपये घेऊ त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी डोंगरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना अब्दुल रौफ आणि पामेश खिमावत या दोघांनाही डोंगरी येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.