बोगस दागिने देऊन कर्ज घेऊन बँकेची बारा लाखांची फसवणुक

मालाड येथील घटना; ज्वेलर्स व्यापार्‍यासह चौघांविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ मार्च २०२४
मुंबई, – बोगस दागिने तारण ठेवून बँकेतून सुमारे बारा लाख रुपयांचे गोल्ड लोन घेऊन फसवणुक झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन ज्वेलर्स व्यापार्‍यासह चौघांविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अमीत जाना, समीर सामंता, सुभाषचंद्र भिमराज संघवी आणि सुनिलकुमार कन्हैयालाल शुक्ला अशी या चौघांची नावे आहेत. यातील अमीत आणि समीर इमिटेशन व्यापारी तर सुभाषचंद्र व सुनिलकुमार ज्वेलर्स व्यापारी आहेत. या चौघांनी कट रचून ही फसवणुक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

अविनाशकुमार सहदेवप्रसाद सिंग हे एका खाजगी बँकेत मॅनेजर म्हणून काम करत असून ते कांदिवलील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये राहतात. त्यांची नेमणूक सध्या मालाड येथील राणी सती मार्गावरील बँकेच्या शाखेत आहे. त्यांच्या पूर्वी तिथे शशांककुमार विजयकुमार ठाकूर हे शाखा मॅनेजर म्हणून काम पाहत होते. त्यांच्या बँकेत गोल्ड लोनची सुविधा असून त्यासाठी बँकेने सुभाषचंद्र संघवी आणि सुनिलकुमार शुक्ला यांची अधिकृत मुल्यांकर्ता म्हणून नियुक्ती केली होती. ते दोघेही ज्वेलर्स व्यापारी असून त्यांच्या मालकीचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. शशांककुमार यांच्या कार्यकाळात त्यांच्या बँकेतून अमीत जाना याने गोल्ड लोनसाठी अर्ज केला होता. यावेळी त्याने बँकेत काही सोने तारण म्हणून ठेवले होते. या दागिन्यांची सुनिकुमार शुक्ला यांच्याकडून तपासणी केल्यानंतर त्याला बँकेने ३ लाख ४ हजार, २ लाख ५३ हजार रुपयांचे दोन वेळा गोल्ड लोन कंजूर केले होते. अशाच प्रकारे समीर सामंता याला बँकेतून २ लाख ९५ आणि ३ लाख ३७ हजार रुपये असे सुमारे बारा लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. त्याने दिलेल्या सोन्याच्या दागिन्याचे तपासणीही सुनिलकुमार शुक्लाने केली होती. ते दागिने खरे असल्याचे अभिप्राय दिल्यानंतर या दोघांनाही गोल्ड लोन मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर या दागिन्यांची सुभाषचंद्र सिंघवी याच्याकडून शहानिशा करण्यात आली होती. त्याने ते दागिने खरे असल्याचे सांगितले होते.

कर्ज घेतल्यानंतर अमीत आणि समीर यानी कर्जाचे नियमित हप्ते भरले नव्हते. बँकेतून विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. फेब्रुवारी २०२४ रोजी या सर्व दागिन्यांचे ऑडिट करण्यात आले होते. यावेळी अमीत आणि समीर यांनी बँकेत दिलेले सर्व दागिने बोगस असल्याचे उघडकीस आले होते. चौकशीदरम्यान अमीत जाना आणि समीर सामंता हे दोघेही मालाड परिसरात इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करत होते. त्यासाठी त्यांनी तिथे एक गाळा भाड्याने घेतला होता. गोल्ड लोन मंजूर झाल्यानंतर त्यांनी त्यांचा व्यवसाय बंद करुन पलायन केले होते. हा प्रकार निदर्शनास येताच बँकेच्या वतीने दिडोंशी पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर या दोन्ही कर्जदार व्यापार्‍यासह ज्वेलर्स व्यापारी अशा चौघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या चारही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page