बोगस सोने तारण ठेवून बँकेला गंडा घालणार्या महिलेस अटक
खातेदारांशी संगनमत करुन बोगस सोन्यावर कर्ज मिळवून दिल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ डिसेंबर २०२४
मुंबई, – बोगस सोने तारण ठेवून सुमारे ३९ लाख रुपयांच्या कर्जाच्या रक्कमेचा अपहार करुन एका खाजगी बँकेची फसवणुक केल्याचा आरोप असलेल्या सपना नयनकुमार भट या गोल्ड व्हॅल्यूअर महिलेस मालाड पोलिसांनी अटक केली. तिने पाच खातेदारांशी संगनमत करुन बोगस सोन्यावर कर्ज मिळवून बँकेची फसवणुक केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत तिच्यासह पाच खातेदारांना सहआरोपी करण्यात आले होते. त्यात शमी अनिल खत्री, जयनेंद्र जाधव, रफत शमी खत्री, यश जय पारेख आणि पारेख जलपाबेन यश अशी या पाच खातेदारांचा समावेश आहे. सपनाने विविध बँकेसाठी गोल्ड व्हॅल्यूअर म्हणून काम करताना अनेक फसवणुकीचे गुन्हे केले असून ती सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
साविओ मोंटरो हे बोरिवली परिसरात राहत असून ते मॉर्डल सहकारी बँकेत मॅनेजर म्हणून काम करतात. बँकेकडून त्यांच्या ग्राहकांसाठी सोने तारण योजना सुरु करण्यात आली असून त्यासाठी बँकेने गोल्ड व्हॅल्यूअर म्हणून सपना भट हिची नेमणूक केली होती. सोने प्रमाणित करुन त्याची गुणवत्ता तपासणे, सोन्याचे वजन करुन त्याची किंमत निश्चित करणे, सोन्यावर देण्यात येणार्या कर्जाचे प्रमाण निश्चित करणे आदी काम सपना भट हिच्याकडे होती. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत मालाडच्या बँक शाखेत लॉरेन्स नरोन्हा हे मॅनेजर म्हणून कार्यरत होते. यावेळी बँकेच्या सहा खातेदारांनी सोने तारण योजनेसाठी अर्ज केला होत. १० ऑगस्ट ते १८ नोव्हेंबर २०२१ या सहाजणांनी बँकेत सोने तारण ठेवून कर्ज घेतले होते. यावेळी सपना भट हिने बँक व्हॅल्यूअर म्हणून काम पाहिले होते. सोन्याची तपासणी, किंमत निश्चित केल्यानंतर या खातेदारांना बँकेकडून सुमारे ३९ लाख रुपयांच्या सोने तारण कर्जाचे वाटप करण्यात आले होते. कर्जाची ही रक्कम सहा खातेदारांच्या बँक खात्यात जमा झाली होती.
मात्र कर्ज घेतल्यानंतर या सहाजणांनी कर्जाचे हप्ते भरले नव्हते. त्यामुळे या सर्वांना बँकेकडून नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र नोटीस बजावूनही त्यांच्याकडून बँकेला उत्तर मिळाले नाही. त्यामुळे बँकेने त्यांच्या सोन्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरु केली होती. कर्जाच्या वसुलीसाठी दागिन्यांची फेर मूल्याकंन गरजेचे होते. त्यामुळे बँकेच्या पॅनेलवरील ज्वेलर्स व्यापार्याकडे ते सर्व दागिने तपासणीसाठी दिले होते. या दागिन्यांची तपासणी केल्यानंतर खातेदारांनी सोने तारण कर्जासाठी दिलेले सर्व दागिने बोगस असल्याचे उघडकीस आले होते. खातेदारांनी बोगस दागिने दिले असतानाही सपना भट हिने ते दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र देऊन खातेदारांना कर्ज देण्यास सांगून बँकेची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच साविओ मोंटरो यांनी मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सपना भटसह इतर पाचही खातेदाराविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
याच गुन्ह्यांत सपनाला वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले होते. अखेर तिला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहे. सपना भट ही सराईत गुन्हेगार असून तिने अशाच प्रकारे इतर काही बँकेची फसवणुक केली आहे. तिच्याविरुद्ध कांदिवली, ओशिवरा, मालाड, बांगुरनगर, गोरेगावसह इतर पोलीस ठाण्यात अनेक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांत तिला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. तिच्या चौकशीतून अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.