मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – हॉटेलची बोगस वेबसाईट तयार करुन ऑनलाईन बुकींगसाठी पैसे भरण्यास प्रवृत्त ग्राहकांसह हॉटेलची फसवणुक केल्याप्रकरणी आकश शामलाल यादव या ठगाला अखेर अंधेरी पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत आकाश हा सध्या पोलीस कोठडीत असून त्याला याकामी मदत करणार्या त्याच्या इतर सहकार्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
अजय शाम डिंगळे हा न्यू पनवेल येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतो. अंधेरीतील चकाला, सहार रोडवर असलेल्या हॉटेल सुबा इंटरनॅशनलमध्ये तो सध्या आयटी सहाय्यक म्हणून कामाला आहे. या हॉटेलची एक अधिकृत वेबसाईट असून त्यात त्यांच्या ग्राहकांसाठी लॉजिंग, रेस्ट्रॉरंट आणि बॅन्क्वेट्स हॉल आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अनेकदा त्यांचे ग्राहक ऑनलाईनसह हॉटेलच्या अधिकृत मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून बुकींग करतात. ८ जानेवारीला हॉटेलच्या क्रमांकावर एका व्यक्तीने फोन करुन त्याने एक रुम केला असून त्याचे पेमेंट केल्याची माहिती दिली. मात्र रुमबाबत त्याला अद्याप कन्फर्मेशन आलेले नाही. त्यामुळे रिसेप्शनीस्ट नम्रता हिने हॉटेलच्या संगणक सिस्टममध्ये रुम बुकींगची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांच्या नावाने कुठलाही रुम बुकींग दिसून आले नाही. त्यानंतर तिने ही माहिती आयटी विभागाला दिली होती. त्यामुळे त्यांनी त्याची शहानिशा सुरु केली होती.
सोशल मिडीयावर सर्च केल्यानंतर अजय डिंगळेला अज्ञात व्यक्तीने त्यांच्याच हॉटेलची हुबेहुव दिसणारी बोगस वेबसाईट तयार करुन त्याद्वारे अनेक ग्राहकांचे बुकींग घेतल्याचे दिसून आले. त्यात हॉटेलची माहिती जशाच तशी असून फक्त मोबाईल क्रमांक दुसरा होता. त्यामुळे त्यांना विविध ग्राहकांकडून बुकींगसाठी पेमेंट केल्याचे कॉल येत होते. ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करण्यास सांगून ही रक्कम दोन विविध बँक खात्यात जमा होत होती. हा प्रकार उघडकीस येताच हॉटेलच्या वतीने अजय डिंगळेने अंधेरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची अंधेरी पोलिसांनी गंभीर दखल घेत बोगस वेबसाईटद्वारे बुकींग घेऊन हॉटेलची फसवणुक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. या तक्रारीनंतर सायबर सेल पोलिसांनी तपासाला सुरुवात करुन आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली होती.
तांत्रिक माहितीवरुन आकाश यादव याचे नाव समोर आले होंते. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच दोन दिवसांपूर्वी आकाशला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच त्याच्या इतर सहकार्यांच्या मदतीने सुबा इंटरनॅशनल हॉटेलची बोगस वेबसाईट तयार करुन त्याद्वारे बुकींग घेऊन ग्राहकांसह हॉटेलची आर्थिक फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या इतर सहकार्यांचा पोलीस शोध घेत आहेत.