मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ जानेवारी २०२५
विरार, – आयकर विभागात वरिष्ठ पदावर संधी असल्याची बतावणी करुन अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींकडून घेऊन फसवणुक करणार्या एका वॉण्टेड तोतया आयकर आयुक्ताला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या अधिकार्यांनी अटक केली. रिंकू जितू शर्मा असे या ३३ तोतया आयुक्ताचे नाव असून त्याने आतापर्यंत ४० हून अधिक तरुण-तरुणींची नोकरीच्या आमिषाने सुमारे दोन कोटींना गंडा घातल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या अटकेने फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
१२ डिसेंबरला यातील तक्रारदारांनी पेन्हार पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज केला होता. त्यात त्यांना रिंकू शर्मा नावाच्या एका व्यक्तीने तो आयआरएस अधिकारी असून सध्या त्याची पोस्टिंग सध्या आयकर विभागात आयुक्तपदी असल्याचे सांगितले होते. आयकर विभागात मोठ्या प्रमाणात विविध पदासाठी नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यांच्या मुलीला आयकर निरीक्षक म्हणून नोकरी मिळवून देतो असे सांगितले. या नोकरीसाठी त्याने त्यांच्याकडे पंधरा लाख रुपये घेतले होते. रिंक स्वतला आयकर आयुक्त सांगून आयकर विभागाचा लोगो असलेले अंबर दिव्याचे वाहन वापरुन फिरत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांच्या मुलीच्या नोकरीसाठी त्याला पंधरा लाख रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांच्या मुलीला नोकरी मिळवून दिली नाही किंवा नोकरीसाठी दिलेले पैसेही परत केले नव्हते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पेल्हार पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. अशाच प्रकारच्या इतर काही तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारीची पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, सहाय्यक फौजदार अशोक पाटील, पोलीस हवालदार मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुमीत जाधव, युवराज वाघमोडे, सुनिल पाटील, मनोहर तारडे, तुषार दळवी, आतिष पवार, मसबु सागर सोनावणे, प्रविण वानखेडे, गणेश यादव आणि सायबर सेलचे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी रिंकू शर्माला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत रिंकू याचे आयकर विभागाशी काहीही संबंध नव्हता. तरीही तो सर्वांना तो आयकर विभागात आयुक्त पदावर काम करत असल्याचे सांगत होता. ३३ वर्षांचा रिंकू हा चालक असून तो सध्या नवी मुंबईतील आरटीओजवळील तळोजा फेज-दोन, सिदधीविनायक होम सोसायटीमध्ये राहतो. त्याच्याकडून पोलिसांनी विविध २८ बोगस ओळखपत्रे जप्त केली आहे. त्यात आयकर विभागाचे आयुक्त आयुक्त, आयकर निरीक्षक, गृह विभागाचे सहाय्यक आयुक्त, सीबीआय पोलीस आयुक्त आदींचा समावेश आहे.
आयकर विभागात नोकरीचे आमिष दाखवून त्याने आतापर्यंत ४० हून अधिक बेरोजगार तरुण-तरुणींची सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणुक केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. हा आकडा तसेच तक्रारदार आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अटकेनंतर रिंकूला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.