आयपीएलच्या बोगस तिकिटांची विक्री करणार्या सुरतच्या टोळीचा पर्दाफाश
बोगस ऑनलाईन वेब पोर्टल तयार करुन कंपनीसह ग्राहकांची फसवणुक
राजू परुळेकर
३१ मार्च २०२४
मुंबई, – आयपीएलच्या बोगस तिकिटांची विक्री करणार्या गुजरातच्या सुरत शहरातील एका टोळीचा दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीने बोगस ऑनलाईन वेब पोर्टल बनवून एका खाजगी कंपनीसह अनेक ग्राहकांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. खुशल रमेशभाई डोबारिया, भार्गव किशोरभाई बोराड, उत्तम मनसुखभाई भिमानी, जास्मिन गिरधरभाई पिठानी, हिंमत रमेशभाई अंताला, निकुंज भुपतभाई खिमानी आणि अरविंदभाई अमीतलाल चोटालिया अशी या सातजणांची नावे असून ते सर्वजण सुरत शहरातील रहिवाशी आहेत. अटकेनंतर या सातही आरोपींना किल्ला कोर्टाने बुधवार ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने आतापर्यंत किती आयपीएल तिकिटांची विक्री करुन किती रुपयांची फसवणुक केली आहे याचा सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे.
गावदेवीतील नेपेयन्सी रोड, एल. जे रोडवरील देवी भवन अपार्टमेंटमध्ये अनिल बिहारीलाल मखिजा हे ६६ वर्षांचे वयोवृद्ध त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते एका खाजगी कंपनीत चीफ ऑपरेटींग ऑफिसर म्हणून कामाला आहेत. २६ मार्चला सायकाळी पाच वाजता त्यांना त्यांच्या कंपनीसारखी दिसणारी एक बोगस ऑनलाईन वेब पोर्टल दिसून आले होते. अज्ञात व्यक्तीने त्यांच्याच कंपनीच्या नावाचा वापर करुन ही बोगस वेब पोर्टल तयार करुन त्याची लिंक तयार करुन बीग ट्री इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ऑनलाईन तिकिट बुकींग पोर्टल असल्याचे भासवून त्याद्वारे आयपीएल २०२४ या सिझनच्या क्रिकेट मॅचचे तिकिट उपलब्ध असल्याचे जाहिरात केली होती. या जाहिरातीला भुलून अनेकांनी लिंकवरुन आयपीएल मॅचचे तिकिट बुकींग केले होते. बुकींग केल्यानंतर त्यांना बोगस तिकिट पाठविले जात होते. अशा प्रकारे अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कंपनीसह ग्राहकांची फसवणुक केली होती. त्यामुळे अनिल मखिजा यांनी दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी भेट घेऊन त्यांना हा प्रकार सांगितला होता. त्यांच्या तक्रार अर्जानंतर सायबर सेल पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४, १२० ब भादवी सहकलम ६६ क, ६६ डी आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच नंदकुमार गोपाळे यांच्या पथकासह गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने संमातर तपास सुरु केला होता.
हा तपास सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन एका टिमला गुजरातच्या सुरत शहरात पाठविण्यात आले होते. या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गवळी, पोलीस हवालदार बंगाले, पोलीस शिपाई उथळे, गावडे यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने खुशल डोबारिया या २४ वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. यावेळी त्याने त्याच्या इतर सहा सहकार्यांची नावे सांगितली. त्यानंतर या पथकाने वेगवेगळ्या परिसरातून भार्गव बोराड, उत्तम भिमानी, जास्मिन पिठानी, हिंमत अंताला, निकुंज खिमाजी आणि अरविंदभाई चोटालिया या सहाजणांना ताब्यात घेतले होते. या सर्वांना नंतर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक सर्व आरोपी सुरतचे रहिवाशी असून त्यांनीच तक्रारदाराच्या कंपनीची बोगस वेब पोर्टल बनवून त्याद्वारे आयपीएल तिकिटांची विक्री करुन फसवणुक केली होती. उत्तम भिमानीने बोगस वेब पोर्टल डेव्हल्प केली होती. भार्गव व जास्मिनने खुशलच्या मदतीने बँक खाते आणि मोबाईल क्रमांक पुरविले होते. हिंमत, निकुंज आणि अरविंदभाई या तिघांनी बँक खात्यातील रक्कम एटीएममधून काढून ती इतर आरोपींना दिली होती. त्यासाठी या तिघांनाही ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाले होते.यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र अधिक तपशील सांगण्यास नकार दिला. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याने आताच काही सांगणे उचित ठरणार नाही. या गुन्ह्यांत इतर काही आरोपी आहेत का, त्याचा शोध सुरु असल्याचे सांगितले.