सावधान विदेशी स्कॉचच्या नावाने बोगस स्कॉचची विक्री सुरु आहे

मालाडसह मिरारोडच्या शांतीपार्कमध्ये स्कॉच बनविणार्‍या कारखान्यात छापा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ मार्च २०२४
मुंबई, – मुंबई शहरात विदेशी स्कॉचच्या नावाने बोगस स्कॉचची विक्री सुरु असून या टोळीशी संबंधित चार आरोपींना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्यांच्या चौकशीतून मालाडसह मिरारोडच्या शांतीपार्कमध्ये स्कॉच बनविण्याचा कारखानाच सुरु असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या कारवाईत या अधिकार्‍यांन सुमारे २८ लाखांचा बोगस विदेशी स्कॉचसह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. नर्शी परबत बाभणिया, भरत गणेश पटेल, विजय शंकर यादव आणि दिलीप हरसुखलाल देसाई अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, उपायुक्त प्रदीप पवार, अधिक्षक नितीन घुले यांनी त्यांच्या पथकाला देशी-विदेशी मद्याची विक्री तसेच वाहतूक करणार्‍या आरोपींविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अशा आरोपींविरुद्ध संबंधित विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना सोशल मिडीयावर ऑनलाईन विदेशी मद्याची विक्री सुरु असून स्कॉचच्या नावाने काहीजण बोगस स्कॉचची विक्री करत असल्याचे उघडकीस आले होते. या माहितीची शहानिशा करण्यासाठी निरीक्षक दिपक शेवाळे, दुय्यम निरीक्षक राजेंद्र शिर्के, राजू वाघ व त्यांच्या सहकार्‍यांनी जुहू तारा रोड, इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ साध्या वेशात पाळत ठेवून संशयास्पद येणार्‍या एका रिक्षाला थांबविले होते. या रिक्षातून प्रवास करणार्‍या नर्शी बाभणिया, दिलीप देसाई, भरत पटेल आणि विजय यादव या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे या अधिकार्‍यांना २४ विविध ब्रॅण्डच्या विदेशी स्कॉच सापडले.

जप्त केलेला विदेशी मद्य बोगस असल्याचे उघडकीस येताच या पथकाने मालाडसह मिरारोडच्या शांतीपार्क परिसरात कारवाई केली होती. यावेळी तिथे बोगस विदेशी स्कॉच बनविण्याचा एक कारखाना सुरु असल्याचे उघडकीस आले. घटनास्थळाहून या अधिकार्‍यांनी रॉयल सॅलूट,ग्लॅन मोरनजी, जॉनी वॉकर, ब्ल्यू लेबल, डॉन ज्युलिओ, ग्रॅण्ड फीडीच, ईअर सॅटोरी, द चिता, बेलुगा, वोडकर आदी विदेशी कंपन्याचे बोगस स्कॉचचा १२५ हून अधिक मद्याचा साठा जप्त केला. त्याची किंमत सुमारे २८ लाख रुपये इतकी आहे. हा मुद्देमाल जप्त करुन संबंधित चारही आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच या चोघांनाही अटक करुन लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. ही कारवाई मद्य निरीक्षक दिपक शेवाळे, दुय्यम निरीक्षक राजेंद्र शिर्के, राजू वाघ, जवान सुनिल टोपले, रश्मिन समेळ, अण्णादुराई उडीयार, महिला जवान तेजस्वी मयेकर यांनी केली तर या गुन्ह्यांचा तपास दुय्यम निरीक्षक राजेंद्र शिर्के हे करत असल्याचे सांगण्यात आले.

सोशल मिडीयावर ऑनलाईनद्वारे मद्यविक्री तसेच अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीसंदर्भात कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्याचे या विभागाच्या टोल क्रमांक १८००२३३९९९९९ आणि व्हॉटअप क्रमांक ८४२२००११३३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page