शिपाई-हमाल पदासाठी बोगस गुणपत्रिका सादर करणे महागात पडले
पाच उमेदवारांविरुद्ध बोगस दस्तावेजासह फसवणुकप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 जुलै 2025
मुंबई, – मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई-हमाल पदासाठी बोगस गुणपत्रिका सादर करणे पाच उमेदवारांना चांगलेच महागात पडले आहे. या पाचही उमेदवाराविरुद्ध आझाद मैदान पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अविनाश सुधाकर पाचपिल्ले, अजय भाऊदेव गायकी, ऋषिकेश सुरेश केदारे, मंगेश सुभाष राणे आणि विक्रम यादव परांजपे अशी या पाचजणांची नावे असून ते सर्वजण वाशिम, बुलढाणा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्वांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
गणेश लालजी जावरे हे मुंबई उच्च न्यायालयाच्या अपिल शाखा, कार्मिक विभागात सहाय्यक प्रबंधक म्हणून कार्यरत आहेत. 21 मार्च 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयात शिपाई-हमाल पदासाठी नोकरी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदासाठी उमेदवार किमान सातवी पास असावा असा महत्त्वाचा निकष होता. जाहिरात प्रसिद्ध होताच 24 मार्च ते 7 एप्रिल 2023 या कालावधीत अनेक उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज केले होते. या अर्जानंतर संबंधित उमेदवाराची स्क्रिनिंग टेस्ट, शारीरिक चाचणी आणि मुलाखत घेण्यातआली होती. त्यात 128 उमेदवारांची निवड करुन त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
या उमेदवारांची स्थानिक जिल्ह्यातील प्रधान जिल्हा, सत्र न्यायाधिशामार्फत गोपनीय चौकशी करुन घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रासह पोलीस पडताळणीची चौकशी पूर्ण करुन त्याचा अहवाल कार्मिक विभागात सादर करण्यात आला होता. या अहवालात पाच उमेदवारांनी त्यांनी सादर केलेले गुणपत्रिकेबाबत संशय निर्माण झाला होता. त्यामुळे अविनाश पाचपिल्ले, अजय गायकी, ऋषिकेश केदारे, मंगेश राणे आणि विक्रम परांजपे यांच्या गुणपत्रिका शहानिशा करण्यासाठी संबंधित विभागासह त्यांच्या विद्यालयात पाठविण्यात आली होती.
त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या पाचही उमेदवारांनी सादर केलेले गुणपत्रिका बोगस असल्याचे उघडकीस आले होते. नोकरी मिळविण्यासाठी या पाचही उमेदवारांनी बोगस गुणपत्रिका सादर करुन मुंबई उच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार उघडकीस येताच गणेश जावरे यांनी आझाद मैदान पोलिसांत पाचही उमेदवाराविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अविनाश पाचपिल्ले, अजय गायकी, ऋषिकेश केदारे, मंगेश राणे आणि विक्रम परांजपे यांच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून पाचही उमेदवारांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्यांना बोगस गुणपत्रिका कोणी दिली याचा तपास करुन संबंधित सर्व आरोपीविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.