फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड तोतया डेप्युटी कलेक्टर गजाआड
एमएमआरडीए-एसआरएच्या फ्लॅटच्या नावाने 20.56 लाखांना गंडा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 मार्च 2025
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका तोतया डेप्युटी कलेक्टरला डी. एन नगर पोलिसांनी अटक केली. अशोक नामदेव अणेकर असे या आरोपी कलेक्टरचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. याच गुन्ह्यांत कैलास पाटील, दिगंबर लोने, चंद्रशेखर कराडे, भगवान सुराळके हे चौघेही सहआरोपी आहे. या टोळीने एका व्यक्तीला एमएमआरडीए-एसआरएचा स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगून 20 लाख 56 हजार रुपयांना गंडा घातल्याचे पोलिसांनी सांगितले.
विशालसिंग लक्ष्मणसिंग राजपूत हे अंधेरीतील आंबोली परिसरात राहत असून गोरेगाव येथील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्याच्या एका मित्राने त्याची कैलास पाटीलशी ओळख करुन दिली होती. त्याने शासकीय कोट्यातील फ्लॅट स्वस्तात मिळवून देतो असे सांगून त्याने आतापर्यंत अनेकांना स्वस्तात फ्लॅट दिल्याचे सांगितले. त्याने त्याच्याकडे एक फ्लॅट उपलब्ध असून त्याची किंमत सत्तर लाख रुपये आहे. तोच फ्लॅट त्याला 28 लाखांना देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्याने त्याला अंधेरीतील नागरदास रोड, मोगरापाडा, भटवाडी एसआरए सहकार सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक ए/1404 दाखविला होता. त्यासाठी त्याने त्याच्याकडून अडीच लाख रुपये घेतले होते, मात्र काही दिवसांनी तो फ्लॅट मिळणार नाही असे सांगून त्याने त्याचे पैसे परत केले होते.
तीन महिन्यानंतर त्याने त्याला एमएमआरडीएचा अधिकार दिगंबर लोने याने त्याचे काम केले असून त्याचे एमएमआरडीएच्या पोर्टलवर नाव आले आहे. त्यानंतर त्याने त्याची ओळख चंद्रशेखर कराडेशी करुन दिली होती. या दोघांनी त्याच्या फ्लॅटचे लवकरात लवकर काम करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्याच्याकडून टोकन म्हणून सात लाख रुपये दिले होते. यावेळी कैलासने दिगंबर लोणे हा त्याला गृहकर्ज मिळवून देईल असेही सांगितले होते. मात्र सहा महिने उलटूनही त्यांनी त्याला फ्लॅट मिळवून दिला होता. त्यानंतर कैलास एका कारमध्ये त्याच्याकडे आला होता. त्याच्या कारवर महाराष्ट्र शासन अशी पाटी होती. त्याच्यासोबत अशोक अणेकर होता. त्याने त्याची ओळख डेप्युटी कलेक्टर म्हणून दिली होती.
त्याची कस्टम हाऊसमधून एमएमआरडीएमध्ये बदली झाली आहे. तोच त्याच्या फ्लॅटचे काम करणार असल्याचे सांगून त्याचा विश्वास संपादन केला. त्यासाठी त्याने त्याच्याकडे 22 लाखांची मागणी केली. त्यामुळे त्याने त्याला 21 लाख रुपये दिले होते. काही दिवसांनी दिगंबर लोणे, कैलास पाटील आणि अशोक अणेकर यांनी त्याला त्याच्या पत्नीच्या नावाने फ्लॅटसह नोटरी सेलचे काही दस्तावेज दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. वेगवेगळे कारण सांगून ते सर्वजण त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्याने त्यांच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. त्यानंतर त्यांनी त्याला काही रक्कम दिली, मात्र 20 लाख 56 हजार रुपये वारंवार मागणी करुनही परत केली नव्हती.
अशा प्रकारे या पाचजणांनी एमएमआरडीए आणि एसआरएचा स्वस्तात फ्लॅटच्या आमिषाने त्याची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात विशालसिग राजपूतने डी. एन नगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अशोक अणेकर, कैलास पाटील, दिगंबर लोने, चंद्रशेखर कराडे, भगवान सुराळके यांच्याविरुद्ध पोलिसांनी फ्लॅटचे बोगस दस्तावेज बनवून 20 लाख 56 हजारचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेला तोतया डेप्युटी कलेक्टर अशोक अणेकर याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरी येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते.