बोगस पासपोर्टवर सिंगापूरला गेलेल्या नेपाळी महिलेस अटक
मुंबई-कोलकाता-दिल्लीमार्गे सिंगापूरला तीन वेळा गेल्याचे तपासात उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ डिसेंबर २०२४
मुंबई, – बोगस दस्तावेजाच्या मदतीने भारतीय पासपोर्टसह व्हिसा मिळवून गैरमार्गाने सिंगापूरला गेलेल्या बिष्णूमती शमन तमंग या महिलेस छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्यांनी ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. तिच्याविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत तिला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बिष्णूमती ही गेल्या दोन वर्षांत मुंबई, दिल्ली-कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन तीन वेळा सिंगापूरला गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
गिता सचिन हेगडे ही अंधेरीतील मरोळ परिसरात राहत असून मुंबई पोलीस दलातील विशेष शाखा दोनमघ्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे. सध्या तिची पोस्टिंग छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्युरो ऑफ इमिग्रेशन म्हणून आहे. बुधवारी रात्री आठ वाजता ती कामावर हजर झालीद होती. यावेळी तिला काऊंटर क्रमांक ६७ जवळ ड्यूटी देण्यात आली होती. तिच्यावर विविध एअरलाईन्समधून विदेशातून येणार्या प्रवाशांचे इमिग्रेशन तपासणी करण्याचे काम सोपविण्यात आले होते. रात्री अकरा वाजता एक महिला तिथे आली होती. ही महिला सिंगापूर येथून आली होती. चौकशीदरम्यान या महिलेवर संशय निर्माण झाल्याने तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान ती नेपाळी नागरिक असल्याचे उघडकीस आले. तिच्याकडे नेपाळी नागरिक असल्याचे काही दस्तावेज सापडले होते. दहा वर्षांपूर्वी ती नेपाळहून भारतात आली होती. कोलकाता येथे वास्तव्यास असताना २०१९ साली तिला विकास छेत्री नावाच्या एका एजंटने बोगस दस्तावेजाच्या मदतीने भारतीय पासपोर्ट बनवून दिला होता. या पासपोर्टनंतर तिला सिंगापूरचा व्हिसा मिळाला होता.
याच पासपोर्टसह व्हिसाच्या मदतीने ती तीन वेळा सिंगापूरला जाऊन भारतात परत आली होती. ११ डिसेंबर २०२२ रोजी दिल्ली, १५ जानेवारी २०२३ रोजी मुंबई आणि १ फेब्रुवारी २०२४ रोजी ती कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सिंगापूरला गेली होती. भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करताना तिने सादर केलेले सर्व दस्तावेज बोगस होते. याच बोगस दस्तावेजाच्या मदतीने तिने भारतीय पासपोर्ट मिळवून त्याचा सिंगापूरला जाण्यासाठी गैरवापर केला होता. तपासात हा प्रकार उघडकीस येताच तिला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते.
याप्रकरणी गिता हेगडे हिच्या तक्रारीवरुन सहार पोलिसांनी बिष्णूमती तमंग या नेपाळी महिलेविरुद्ध बोगस दस्तावेजाच्या मदतीने पासपोर्ट मिळवून विदेशात गैरमार्गाने प्रवास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तिला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत एजंट विकास छेत्री याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याच्या अटकेसाठी सहार पोलिसांची एक टिम लवकरच कोलकाता येथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.