हत्येचा आरोप करुन लुटमारीच्या उद्देशाने प्राध्यापकाला धमकी

कांदिवलीतील घटना; दोन्ही तोतया पोलिसांना अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ एप्रिल २०२४
मुंबई, –  बोरिवली परिसरात झालेल्या हत्येच्या ठिकाणाच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये तुमच्यासारखा एक व्यक्ती दिसत असून तुम्हीच ही हत्या केल्याचा आरोप करुन चौकशीच्या नावाने एका नामांकित कॉलेजच्या प्राध्यापकाला पैशांसाठी धमकी देणार्‍या दोन तोतया पोलिसांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. मनोज दशरथ गुप्ता आणि मुलायम बिरबल यादव अशी या दोन तोतया पोलिसांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. परमेश्‍वर चव्हाण या दक्ष पोलीस हवालदाराच्या सतर्कमुळे या दोन्ही तोतया पोलिसांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

४४ वर्षांचे तक्रारदार कांदिवली परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून मालाडच्या एका नामांकित कॉलेजमध्ये आयटी प्राध्यापक म्हणून काम करतात. ६ एप्रिलला कॉलेजमध्ये लेक्चर कमी असल्याने दुपारी तीन वाजता ते घरी जाण्यासाठी निघाले होते. सायंकाळी साडेचार वाजता ते चालत कांदिवली रेल्वे स्थानकात आले होते. यावेळी त्यांच्याकडे एक ५५ वर्षांचा व्यक्ती आला आणि त्याने तो पोलीस असल्याचे सांगितले. बोरिवली परिसरात एका व्यक्तीची हत्या झाली होती. या गुन्ह्यांतील सीसीटिव्ही फुटेजमध्ये तुझ्यासारखा एक व्यक्ती दिसत आहे. त्यामुळे तुला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावे लागेल असे सांगू लागला. मात्र त्यांनी त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. यावेळी तिथेच उभा असलेला दुसरा व्यक्ती आला आणि त्याने त्यांना जबदस्तीने एका रिक्षात बसविले. रिक्षात बसल्यानंतर त्यांनी त्यांचे खिसे आणि बॅगेची तपासणी केली. या दोघांनीही त्यांना हत्येच्या गुन्ह्यांत अडकायचे नसेल तर त्यांना ५० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. तोपर्यंत ती रिक्षा पोयसर डेपोजवळ आली.

रिक्षातील गोंधळ तिथे गस्त घालणार्‍या पोलीस हवालदार परमेश्‍वर चव्हाण यांनी पाहिला आणि त्यांनी त्यांची बाईक ओव्हरटेक करुन रिक्षाच्या पुढे लावली. यावेळी प्राध्यापकांनी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे ओळखपत्रांची मागणी केली असता ते दोघेही गोंधळून गेले. हा प्रकार संशयास्पद वाटताच ते प्राध्यापकासह दोन्ही आरोपींना घेऊन पोलीस ठाण्यात आले होते. या दोघांनाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गणोरे यांच्यासमोर उभे केले असता ते दोघेही तोतया पोलीस असल्याचे उघडकीस आले. मनोज हा नालासोपारा येथे राहत असून रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध ठाणे, ठाणे ग्रामीण आणि रेल्वेच्या विविध पोलीस ठाण्यात वीसहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला एक वर्षांपूर्वी वसई रेल्वे पोलिसांनी तडीपार केले होते. ही कारवाई सुरु असताना तो कांदिवली येथे लुटमारीच्या उद्देशाने आला होता. मुलायम हा भाईंदर येथे राहत असून तो मनोजच्या सांगण्यावरुन कांदिवली येथे आला होता. त्याचा हा पहिलाच गुन्हा आहे. लुटमारीच्या उद्देशाने त्यांनी तक्रारदार प्राध्यापकांवर हत्येचा आरोप करुन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र त्यांची ही योजना पोलीस हवालदार परमेश्‍वर चव्हाण यांच्यामुळे फसली गेली. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गणोरे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक महेंद्र निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक रोहित हेडगे, नितीन साटम, पोलीस हवालदार परमेश्‍वर चव्हाण यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page