पोलीस असल्याची बतावणी करणार्‍या दुकलीस अटक

रस्त्यावरुन जाणार्‍या वयोवृद्धांना टार्गेट करुन लुटमार करायचे

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – पोलीस असल्याची बतावणी करणार्‍या दोन तोतया पोलिसांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. काबुलअली नौशादअली जाफरी आणि झाहीद जावेदअली जाफरी अशी या दोघांची नावे आहेत. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध तोतयागिरी करुन फसवणुक केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. रस्त्यावरुन जाणार्‍या वयोवृद्धांना टार्गेट करुन ही टोळी त्यांच्याकडील दागिने घेऊन पळून जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अनिल चत्रभुत सोलंकी हे 66 वर्षांचे तक्रारदार कांदिवलीतील मथुरादास रोड, अतुल टॉवरसमोरील कृष्णा हाईट सोसायटीमध्ये राहतात. ते व्यवसायाने व्यावसायिक असून त्यांचा कांदिवली परिसरात फर्निचर विक्रीचा व्यवसाय आहे. याकामात त्यांना त्यांचा मुलगा मदत करतो. सकाळी साडेनऊ वाजता दुकानात गेल्यानंतर ते रात्री आठ वाजता दुकान बंद करुन घरी येतात. 10 जूनला सकाळी साडेनऊ वाजता ते नेहमीप्रमाणे घरातून दुकानात जाण्यासाठी निघाले होते. कांदिवलीतील मथुरादास एक्सटेंशन रोड, ऐश्वर्या इमारतीजवळ येताच तिथे दोन व्यक्ती आले. त्यांनी त्यांना पोलीस असल्याची बतावणी करुन त्यांच्याकडे चौकशी सुरु केली होती.

त्यांनी गांजाचे सेवन केले आहे, मद्यप्राशन केले आहे का असे विचारपूस करुन त्यांना मुंबई शहरात दारुसह ड्रग्जसाठी चोर्‍यामार्‍या होत आहे. त्यामुळे अंगावरील दागिने काढून ठेवा असे सांगितले. त्यामुळे त्यांनी दोन हजाराची कॅश, सोनसाखळी आणि अंगठी एका रुमालात ठेवली होती. त्यानंतर या दोघांनी त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील दागिने आणि कॅश घेऊन पलायन केले होते. हा प्रकार नंतर लक्षात येताच त्यांनी कांदिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही तोतया पोलिसांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तोतयागिरी करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यांतील आरोपीचा शोध सुरु असतानाच दोन दिवसांपूर्वी काबुलअली जाफरी आणि झाहीद जाफरी या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांच्या चौकशीतून अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page