पोलीस असल्याची बतावणी करुन लुटमार करणार्‍या दुकलीस अटक

आरोपीविरुद्ध तोतयागिरी करुन फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 जानेवारी 2026
मुंबई, – पोलीस असल्याची बतावणी करुन पादचार्‍यांना विशेषता वयोवृद्धांना लुटणार्‍या एका दुकलीस दिडोंशी पोलिसांनी अटक केली. कासिम गरीबशहा इराणी आणि मुखवार शेरु हुसैन इराणी अशी या दोघांची नावे आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत या दोघांनी एका वयोवृद्ध महिलेचे सुमारे साडेपाच लाखांचे दागिने पळविले होते. ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध तोतयागिरी करुन फसवणुक केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

स्मिता रघुनाथ चव्हाण ही 69 वर्षांची वयोवृद्ध महिला गोरेगाव येथील नागरी निवारा परिषद, सरस्वती इमारतीमध्ये राहते. तिच्या घरापासून काही अंतरावर शिला रहेजा गार्डन असून तिथे ती नियमित सकाळी मार्निंग वॉकसह व्यायामसाठी जात होती. 28 नोव्हेंबरला ती सकाळी साडेसात वाजता गार्डनमध्ये वॉकसह व्यायाम करण्यासाठी गेली होती. सकाळी पावणेनऊ वाजता ती तिच्या घरी जात होती. घराजवळ असताना तिच्याकडे दोन तरुण आले. त्यांनी तिला ते दोघेही पोलीस असल्याचे सांगितले.

आम्ही प्रत्येक व्यक्तींची तपासणी करत असल्याचे सांगून त्यांनी तिला काही अंतरावर घेऊन आले. त्यानंतर त्यांनी तिला तिच्या अंगावरील दागिने काढण्यास सांगितले. तिचे दोन बांगड्या आणि अंगठी असा साडेपाच लाखांचे दागिने त्यांच्या बॅगेत ठेवून त्यांनी तिची चौकशी सुरु केली होती. काही वेळानंतर त्यांनी दागिने तिच्या पिशवीत ठेवल्याचे भासवत तिला घरी जाण्यास सांगितले. घरी आल्यानंतर तिने पिशवीतून सोन्याचे दागिने काढण्याचा प्रयत्न केला, यावेळी तिला पिशवीत तिचे दागिने नसल्याचे दिसून आले.

या दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करुन तिचे साडेपाच लाखांचे दागिने पळवून नेले होते. हा प्रकार लक्षात येताच तिने दिडोंशी पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तोतयागिरी करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना कासिम इराणी आणि मुखवार इराणी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

चौकशीत ते दोघेही अशा गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. या दोघांविरुद्ध मुंबईसह इतर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. ते दोघेही रस्त्यावरुन जाणार्‍या पादचार्‍यांना विशेषता वयोवृद्धांना गोड बोलून त्यांची दिशाभूल करुन त्यांच्याकडील दागिने घेऊन पलायन करत होते. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page