पोलीस अधिकार्‍याचा गणवेश घालून हॉटेलमध्ये दमदाटी

पुण्याच्या तोतया पोलीस उपनिरीक्षकाला अटक 

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मार्च २०२४
पनवेल, – पोलीस अधिकार्‍याचा गणवेश घालून एका हॉटेलमध्ये दमदाटी करुन मॅनेजरला मारहाण केल्याप्रकरणी सलमान तजमुद्दीन मुलानी या ३१ वर्षांच्या पुण्याचा तोतया पोलीस उपनिरीक्षकाला बुधवारी पनवेल पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध तोतयागिरी करुन मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

पनवेल येथील कोळखे परिसरात सिताज (गोल्ड डिग्गर) नावाचे एक हॉटेल असून तक्रारदार तिथे मॅनेजर म्हणून काम करतात. बुधवारी २७ मार्चला रात्री आठ वाजता हॉटेलमध्ये पोलीस उपनिरीक्षकाचा गणवेश घालून सलमान मुलानी आला होता. त्याने त्याच्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये शिवीगाळ करुन कामावरुन का काढून टाकले याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी तक्रारदार मॅनेजरने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तो दमदाटी करुन त्यांना शिवीगाळ करत होता. काही वेळानंतर त्याने हॉटेलच्या मॅनेजरला बेदम मारहाण केली होती. ही माहिती मिळताच पनवेल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍या सलमान मुलानीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी त्याचा पोलीस खात्याशी काहीही संबंध नसल्याचे उघडकीस आले. तो पोलीस उपनिरीक्षक नसून फक्त दहशत निर्माण करण्यासाठी त्याने हा प्रकार घडवून आणला होता. त्यामुळे हॉटेलच्या मॅनेजरच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सलमानविरुद्ध १७०, ३२३, ५०४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. सलमान हा मूळचा पुण्याचा चाकणचा रहिवाशी असून त्याने पोलीस उपनिरीक्षकप्रमाणे एक युनिफॉर्म घातला होता. तो अनेकांना पोलीस अधिकारी असल्याचे सांगत होता. पोलीस गणवेशात त्याने इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे, सहपोलीस आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बागवान, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, अस्पतवार व अन्य पोलीस पथकांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page