पोलीस असल्याची बतावणी करुन २२ लाखांचे दागिने पळविले
शेख मेमन स्ट्रिटमधील घटना; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – पोलीस असल्याची बतावणी करुन दोन तोतयांनी एका कारागिराकडील सुमारे २२ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केल्याची घटना शेख मेमन स्ट्रिटवर घडली. याप्रकरणी एल. टी मार्ग पोलिसांनी पळून गेलेल्या दोन्ही तोतया पोलिसांविरुद्ध तोतयागिरी करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अनुप बनमाली चोधरी हा सोने कारागिर असून सध्या आग्रीपाडा परिसरात राहतो. तो एका ज्वेलर्स व्यापार्याकडे कामाला असून त्यांच्या सांगण्यावरुन विविध सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करतो. मंगळवारी सायंकाळी त्याच्या मालकाने त्याला २२ लाख रुपयांचे ३९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने डिलीव्हरीसाठी पाठविले होते. ते दागिने घेऊन तो रामवाडी, आदर्श बाग येथून पायी जात होता. सायंकाळी साडेसहा वाजता तो शेख मेनन स्ट्रिट परिसरात आला होता. यावेळी दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला अडविले. आपण पोलीस असल्याची बतावणी करुन त्याने त्याच्याकडील सामानाची झडती घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्याशी बोलण्यात गुंतवून या दोघांनी सुमारे २२ लाख रुपयांचे दागिने घेऊन पलायन केले होते.
हा प्रकार लक्षात येताच त्याने त्याच्या मालकांना ही माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी त्याला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तो एल. टी मार्ग पोलीस ठाण्यात गेला आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी अनुप चौधरी याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पळून गेलेल्या २०४, ३१८ (४) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. घटनास्थळीचे पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींची ओळख पटवून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.