मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – ई-सिगारेटची कारवाईची धमकी देऊन एका २१ वर्षांच्या तरुणाकडे पैशांची मागणी करणार्या तीन तोतया पोलिसांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. दिलशाद मुन्नवर खान, मोहम्मद रफिक रज्जाक चौधरी आणि सिमरणजीत भुपेंदरजीत सिंग अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
२१ वर्षांचा तक्रारदार तरुण पवई परिसरात राहतो. १४ ऑक्टोंबरला सायंकाळी साडेचार वाजता तो पवईतून रिक्षातून प्रवास करत होता. ही रिक्षा होली फॅमिली चर्चजवळ येताच बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने रिक्षाला ओव्हरटेक केले. या दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करुन त्याच्यावर ई-सिगारेटची कारवाईची धमकी दिली. कारवाई टाळण्यासाठी त्याच्याकडे त्यांनी पन्नास हजाराची मागणी केली होती. त्याने पैसे नसल्याचे सांगताच ते त्याला घेऊन जवळच्या बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये आले होते. तिथे त्यांनी त्याला पैसे काढण्यास प्रवृत्त केले होते. ते दोघेही तोतया पोलीस असल्याचे लक्षात येताच त्याने त्यांचे मोबाईलवरुन व्हिडीओ काढले होते. पैसे उकाळण्याचा प्रयत्न फसल्यानंतर ते दोघेही पळून गेले होते. यावेळी तिथे गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पळून जाणार्या दोघांसह अन्य एका आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. याप्रकरणी या तरुणाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपी तोतया पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर तिघांनाही पोलिसांनी अटक केली. या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.