मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 एप्रिल 2025
मुंबई, – रस्त्यावरुन जाणार्या महिलेसह दोन वयोवृद्धांना पोलीस असल्याची बतावणी करुन अज्ञात चोरट्याने त्यांच्याकडील सुमारे पावणेसहा लाखांचे दागिने घेऊन पलायन केल्याची घटना गोवंडी आणि सांताक्रुज परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवनार आणि सांताक्रुज पोलिसांनी दोन स्वतंत्र तोतयागिरी करुन लुटमार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. सीसीटिव्ही फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
60 वर्षांच्या वयोवृद्ध सुजाता शशी मोहन ही चेंबूर येथे राहते. सोमवारी सकाळी दहा वाजता ती गोवंडीतील पी. एल लोखंडे रोड, तरंग बॅक्वेट हॉलसमोरुन जात होती. यावेळी तिथे तीन तरुण आले आणि त्यांनी तिला पोलीस असल्याचे सांगितले. सध्या रस्त्यावर लुटमारीच्या घटना घडत असून विशेषता वयोवृद्धांना लुटारुंकडून टार्गेट केले जात होते. त्यामुळे अंगावरील सर्व सोन्याचे दागिने काढा. ते पोलीस असल्याचे समजून तिने तिचे चार सोन्याच्या बांगड्यासह ब्रॅसलेट, अंगठी आणि हिर्याची अंगठी असे साडेचार लाखांचे दागिने रुमालात ठेवले होते. काही वेळानंतर त्यांनी दागिने असलेला रुमाल घेऊन तेथून पलायन केले होते. हा प्रकार सुजाता मोहन हिच्या लक्षात येताच तिने देवनार पोलिसांत तक्रार केली होती.
दुसरी घटना सांताक्रुज येथे घडली. प्रकाश भाऊ शिवलकर हे 77 वर्षांचे वयोवृदध फिरोजा मेहता रोड, सुखानंद अपार्टमेंटमध्ये राहत असून सध्या ते निवृत्त आहेत. रविवारी सकाळी पावणेसात वाजता ते मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. पौद्दार रस्ता, जैन मंदिराजवळ जाताना बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने त्यांना पोलीस असल्याचे सांगून त्यांचे आयडी कार्ड दाखविण्याचा प्रयत्न केला. पोलीस राऊंड अप सुरु आहे. त्यामुळे दागिने काढून ठेवा, त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांची सव्वालाखांची सोनसाखळी आणि अंगठी एका पेपरमध्ये काढून ठेवली. यावेळी या दोघांनी हातचलाखीने दागिने असलेले पेपर घेऊन पलायन केले होते. काही अंतर गेल्यानंतर हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सांताक्रुज पोलिसांना ही माहिती देऊन दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या दोन्ही घटनेनंतर देवनार आणि सांताक्रुज पोलिसांनी तोतयागिरी करुन लुटमार केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या तोतया पोलिसांचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.