मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 मे 2025
मुंबई, – पोलीस असल्याची बतावणी करुन पुण्यातील दोन रियल इस्टेट व्यावसायिकाची नऊजणांच्या एका टोळीने 25 लाखांची कॅश घेऊन पलायन केल्याची घटना विक्रोळी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रविण मुंगसे, दशरथ लोहोटे, मुकूंद या तीन मुख्य आरोपीसह नऊजणांविरुद्ध विक्रोळी पोलिसांनी भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
पुण्यातील नारायण पेठ, विठ्ठल रखुमाई अपार्टमेंटचे रहिवाशी असलेले संतोष बाबूराव खांबे हे रियल इस्टेट व्यावसायिक आहेत. पुण्यात त्यांचा जमिन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून तिथे त्यांचे एक कार्यालय आहे. या व्यवसायात त्यांचा अमीत कारंडे हा पार्टनर आहे. 15 एप्रिलला अमीत त्यांच्या कार्यालयात आला होता. त्याने प्रविण मुंगसे हा त्याच्या परिचित असून तो त्याला 25 लाख रुपये दिले तर तो त्यांना बाजारात वापरात येईल असे 50 लाख रुपयांच्या चलनी नोटा देईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी प्रविणकडे गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. 29 एप्रिलला अमीतने त्यांना फोन करुन दुसर्या दिवशी त्यांना 25 लाख रुपये घेऊन चेंबूर येथे जायचे आहे असे सांगितले. त्यामुळे संतोष खांबे साडेसोळा तर अमीत कारंडे साडेआठ लाख रुपये असे 25 लाख रुपये घेऊन पुण्यातून मुंबईत आले होते.
बुधवारी 30 एप्रिलला ते दोघेही पावणेतीन वाजता चेंबूर रेल्वे स्थानकात आले होते. काही वेळाने तिथे प्रविण, त्याचा मित्र दशरथ लोहोटे आले. या दोघांना घेऊन ते सर्वजण चेंबूरच्या स्वास्तिक, सुरभी हॉटेलजवळ आले होते. तिथे सविस्तर चर्चा केल्यानंतर प्रविणने त्यांना कार्यालयात जाऊन 50 लाखांचे भारतीय चलन देण्याचे आश्वासन दिले. याच दरम्यान एका इर्टिका कारमधून आलेल्या चार तरुणांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आपण पोलीस असल्याची बतावणी करुन त्यांची चौकशी सुरु केली होती. त्यांच्याकडील बॅगेची तपासणी करुन पैशाविषयी विचारणा केली होती.
या चौकशीदरम्यान ते सर्वजण 25 लाख रुपये असलेली बॅगे घेऊन ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या दिशेने भरवेगात निघून गेले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याचा चार ते पाच किलोमीटर पाठलाग केला. मात्र ते सर्वजण पळून जाण्यात यशस्वी झाले. प्रविण आणि दशरथ यांनीच कट रचून 50 लाखांचे भारतीय चलनातील नोटा देण्याची बतावणी करुन त्यांना पुण्यातून मुंबईत बोलावून पोलिसांची कारवाई झाल्याचे चित्र निर्माण करुन त्यांच्याकडील 25 लाखांची कॅश घेऊन पलायन केले होते. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार विक्रोळी पोलिसांना सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी तोतयागिरी करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.