बोगस पोस्टल स्टॅम्प बनविणार्‍या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

बिहार-दिल्लीतून पाचजणांना लाखो रुपयांच्या स्टॅम्पसह अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 फेब्रुवारी 2026
मुंबई, – भारतीय डाक विभागाच्या बोगस पोस्टल स्टॅम्प बनविणार्‍या एका आंतरराज्य टोळीचा माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत बिहार आणि दिल्लीतून पाचजणांना पोलिसांनी अटक केली असून या टोळीकडून लाखो रुपयांचे बोगस पोस्टल स्टॅम्पसह इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत. राकेश रामधनी बिंद, शमशोद्दीन अहमद मोहम्मद इरफान गफार, शाहिद अहमद रजा, मोहम्मद शहाबुद्दीन सुल्तान शेख आणि विरेंदर सहदेव प्रसाद अशी या पाचजणांची नावे आहेत. ते सर्वजण बिहार, दिल्ली आणि उत्तरप्रदेशचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

देशभरातील विविध राज्यात काहीजण बोगस पोस्टल स्टॅम्प बनवून त्याची विक्री करत आहेत. या बोगस पोस्टल स्टॅम्पमुळे भारतीय डाक विभागाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याची तक्रार मुंबईच्या जीपीओचे डाक निरीक्षक आशुतोष जमादारसिंह कुमार यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत संबंधित आरोपींविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते.

या आदेशांनतर अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुढे, सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश साबळे, पोलीस निरीक्षक फरीद खान, प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनेश सातार्डेकर, पोलीस शिपाई प्रकाश हाके, सचिन मंडले, राहुल कांबळे, पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी तपास सुरु केला होता.

तांत्रिक माहितीवरुन 19 सप्टेंबर 2025 रोजी राकेश बिंद याला मुंबईतून, 16 ऑक्टोंबर 2025 रोजी शमशोद्दीन गफार व शाहिद रजा या दोघांना बिहार येथून पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर या पथकाने मोहम्मद शहाबुद्दीन आणि विरेंद्रर प्रसाद या दोघांना 8 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्लीतून पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीत ते सर्वजण बोगस पोस्टल स्टॅम्प बनवून त्याची देशभरातील विविध राज्यात विक्री करत असल्याचे उघडकीस आले होते.

अशा प्रकारे बोगस पोस्टल स्टॅम्प विक्री करणारी ही आंतरराज्य टोळी आहे. त्यांच्या बँक खात्याची तपासणी केल्यानंतर त्यात सात ते आठ कोटीचे व्यवहार झाल्याचे दिसून आले. या कटातील मोहम्मद शहाबुद्दीन आणि विरेंदर प्रसाद हे दोघेही मुख्य आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडून पोलिसांनी 27 लाख 84 हजार 200 रुपयांचे मदर टेरेसा, छत्रपती शिवाजी महाराज, मौलाना अब्दुल कलाम, सरदार वल्लभभाई पटेल, अशोक स्तंभाचे चित्र असलेलेबोगस पोस्टल स्टॅम्पचा साठा जप्त केला आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page