बोगस रेल्वे पासवर लोकलमध्ये प्रवास करणार्या दोघांना अटक
युटीएस अॅपवर पास बनविणार्या तिसर्या सहकार्याचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 डिसेंबर 2025
मुंबई, – बोगस रेल्वे पासवर लोकलच्या प्रथम दर्जाच्या डब्ब्यातून प्रवास करणार्या एका प्रवाशासह दोघांना बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. आकाश पुरुषोत्तम वरठी आणि अनिकेत किणी अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. सध्या ते दोघेही न्यायालयीन कोठडीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता कुपेकर यांनी सांगितले. त्यांना त्यांच्या एका मित्राने युटीएसवर बोगस रेल्वे पास बनवून दिल्याचे उघडकीस आले असून पास बनविणार्या तिसर्या आरोपीचा रेल्वे पोलिसांकडून शोध सुरु आहे.
विष्णू रामसिंह ठाकूर हे मालाड येथे राहत असून पश्चिम रेल्वेत वाणिज्य सहतिकिट लिपीक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी दुपारी ते त्यांचे सहकारी बलजीत सिंह यांच्यासोबत बोरिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांचे तिकिट आणि पास तपासणीचे काम करत होते. सायंकाळी चार वाजता ते दोघेही चर्चगेटच्या दिशेने जाणार्या एका लोकलमध्ये प्रवाशांचे तिकिट तपासणी करत होते. कांदिवली रेल्वे स्थानक येण्यापूर्वी त्यांनी एका प्रवाशाकडे तिकिटाची मागणी केली होती. यावेळी त्याने त्याच्या मोबाईलवरुन विरार ते चर्चगेटचा प्रथम दर्जाचे रेल्वे पास दाखविले होते.
या पासबाबत संशय आल्याने त्यांनी त्यांच्याकडील एचएचटीवर (हॅण्ड हेल्ड टर्मिनस) त्याचा रेल्वे पासची पाहणी केली होती. त्यात तो पास बोगस असल्याचे उघडकीस आले. त्याने रेल्वेचा बोगस प्रथम दर्जाचे पास बनवून लोकलमधून प्रवास करत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्याला त्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात आणले. त्याच्या तिकिटावरील बारकोड त्यांच्या मोबाईलवर स्कॅनवर स्कॅन केल्यानंतर तो बारकोड इनव्हॉलिड असल्याचे दिसून आले.
चौकशीत या तरुणाचे नाव आकाश वरळी होते, तो पालघरच्या सागरपाडा, नायगावचा रहिवाशी होता. तपासात त्याने विरार ते चर्चगेट दरम्यानचा रेल्वेचा प्रथम दर्जाचा बोगस पास मोबाईलवरील युटीएस अॅपवरुन बनविला होता. याच बोगस पासवर तो लोकलमधून प्रवास करत असल्याचे उघडकीस आले. हा प्रकार उघड होताच विष्णू ठाकूर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध बोगस दस्तावेजाचा वापर करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक जयश्री मुलगीर यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
आकाशच्या चौकशीतून त्याच्या एका मित्राचा सहभाग उघडकीस आला होता. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता कुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयश्री मुलगीर व अन्य पोलीस पथकाने त्याचा मित्र अनिकेत किणी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच आकाशसह अनिकेत या दोघांना पोलिसांनी अटक केली. चौकशीत ते दोघेही एका खाजगी कंपनीत कामाला असून गेल्या दिड ते दोन महिन्यांपासून ते बोगस रेल्वे पासवर लोकलमध्ये प्रवास करत होते. त्यांना त्यांच्या एका मित्राने मोबाईलवर युटीएस अॅपवर बोगस पास बनवून दिले होते.
अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर या दोघांनाही सोमवारी कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत बोगस पास बनविणार्या आरोपीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.