मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 नोव्हेंबर 2025
मुंबई, – आरटीओ अधिकारी असल्याची बतावणी करुन वाहनचालकांची फसवणुक करणार्या एका टोळीचा समतानगर पोलिसांनी पर्दाफाश केला. सचिन सुभाष चव्हाण आणि अजीत भगत सिंग अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
भव्या लालचंद्र सुभार हा तरुण मालाडच्या फिल्मसिटी रोड परिसरात राहतो. 18 नोव्हेंबरला रात्री साडेआठ वाजता तो त्याचा मित्र हार्दिक धोंडिया याला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळील पोयसर मेट्रो स्टेशनजवळ सोडण्यासाठी आला होता. यावेळी तिथे असलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांची कार थांबविली होती. आपण आरटीओ अधिकारी असल्याची बतावणी करुन त्यांनी तिथे कार का थांबविली याबाबत जाब विचारला होता. त्यांची कार स्कॅन करावी लागेल, ती कार आरटीओ कार्यालयात जमा करावी लागेल असे सांगून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची धमकी दिली होती.
त्यांच्याकडून ऑनलाईन पाच हजार दोनशे रुपये घेतले होते. त्यानंतर ते दोघेही तेथून पळून गेले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच भव्या सुभार याने समतानगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही तोतया आरटीओ अधिकार्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेचे आदेश समतानगर पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्घ फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे, पोलीस निरीक्षक अजीतसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राऊत, पोलीस उपनिरीक्षक राहुल वाळुंजकर, पोलीस हवालदार किणी, निजाई, पोलीस शिपाई जाधव, शिंदे यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी सचिन चव्हाण आणि अजीत सिंग या दोघांना ताब्यात घेतले होते.
चौकशीत दोन्ही आरोपी नायगावच्या परेरानगरचे रहिवाशी असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडून फसवणुक करुन ऑनलाईन स्विकारलेली पाच हजार दोन रुपयांची कॅश जप्त करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून या चौकशीतून अशाच प्रकारच्या इतर काही फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.