मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ ऑगस्ट २०२४
मुंबई, – भिवंडी परिसरात दोन ठिकाणी सुरु असलेल्या बोगस टेलिफोन एक्सचेंजचा महाराष्ट्र एटीएसच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. बोगस टेलिफोन एक्सचेंज चालविणार्या जाफर बाबू उस्मान पटेल या ४० वर्षांच्या आरोपीस अटक केली असून याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी दिनस्टार कंपनीचे नऊ सिम बॉक्स, विविध कंपन्यांचे २४६ सिमकार्ड, विविध कंपन्याचे आठ वायफाय राऊटर, सिमबॉक्स चालविण्यासाठी वापरण्यात येणारे १९१ ऍण्टिना, सीमबॉक्स कार्यान्वित राहावा यासाठी वापरण्यात येणारे इनव्हर्टर असा सुमारे एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या बोगस टेलिफोन एक्सचेंजमुळे आतापर्यंत केंद्र सरकारचा सुमारे तीन कोटीचा महसुल बुडाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
बोगस टेलिफोन एक्सचेंजच्या माध्यमातून काही टोळ्या शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. या माहितीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत एटीएसला आरोपींची माहिती काढून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते. ही माहिती काढताना भिवंडी परिसरात अशाच प्रकारे काही अनधिकृत टेलिफोन एक्चेंज सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने भिवंडतील नालासोपारा, नवीन गौरीपाडा आणि रोशनबाग परिसरात एकाच वेळेस छापा टाकून तिथे चालणार्या बोगस टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर जाफर पटेल याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत गेल्या दिड वर्षांपासून दोन्ही ठिकाणी बोगस टेलिफोन एक्सचेंज सुरु होता. त्यामुळे शासनाचा सुमारे तीन कोटीचा महसूल बुडाला आहे. या गुन्ह्यांत जाफरचे इतर काही सहकार्यांची नावे समोर आली आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. झटपट पैशांसाठी या टोळीने बोगस टेलिफोन एक्सचेंज सुरु केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
बेकायदेशीर सीमबॉक्सच्या सहाय्याने त्यांनी ते अनधिकृत टेलिफोन एक्सेचंज सुरु केले होते. तपासात ही माहिती उघडकीस येताच संबंधित आरोपीविरुद्ध ३१८ (४), ३ (५) भारतीय न्याय संहिता सहकलम भारतीय टेलिग्राफ कायदा कलम ४, सहकलम टेलिकम्युनिकेशन कायदा कलम ४२ आणि इंडियन वायरलेस टेलिग्राफी कायदा कलम ३, ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर जाफर पटेलला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला शुक्रवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.