मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 नोव्हेंबर 2025
मुंबई, – बोगस तिकिटावर प्रवास करणार्या सागर काशिराम कनोजिया या 18 वर्षांच्या तरुण प्रवाशाला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी वांद्रे रेल्वे टर्मिनस-बस्ती दरम्यानचे एक बोगस तिकिट जप्त केले आहेत. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.
यातील तक्रारदार मिरारोड येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते भारतीय रेल्वेमध्ये कामाला असून सध्या पश्चिम रेल्वेत मुख्य तिकिट निरीक्षक म्हणून काम करतात. सध्या त्यांच्यावर लांबपल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणार्या प्रवाशांचे तिकिट आणि ओळखपत्र तपासण्याचे काम आहे. त्याचा दैनदिन अहवाल ते त्यांच्या वरिष्ठांना देतात. बुधवारी 29 ऑक्टोंबरला ते अवध एक्सप्रेसमध्ये काही प्रवाशांचे तिकिट आणि ओळखपत्र पाहण्याचे काम करत होते.
यावेळी एस वन कोचमधून प्रवास करणार्या सागर कनोजिया याचे तिकिट पाहत असताना त्याचे तिकिट वांद्रे टर्मिनस ते बस्ती असल्याचे दिसून आले. त्याच्या तिकिटाची पाहणी करताना त्यांना काहीतरी गडबड असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या मुख्य तिकिट निरीक्षक मोहम्मद जाहिद कुरेशी यांना बोलावून त्याच्याकडील तिकिटाची पाहणी करण्यास सांगितले. त्यांनी तिकिटाची पाहणी केल्यानंतर ते बोगस तिकिट असल्याचे उघडकीस आले.
ते तिकिट त्याने कुठल्या रेल्वे स्थानकातून काढले याबाबत विचारले असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे त्याला बोरिवली रेल्वे स्थानकात उतरवून रेल्वे पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथे त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बोगस तिकिटावर वांद्रे रेल्वे टर्मिनस-बस्ती असा प्रवास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. अठरा वर्षांचा सागर हा वडाळ्यातील अॅण्टॉप हिल, संगमनगरचा रहिवाशी असून त्याने अशाच प्रकारे बोगस तिकिटावर यापूर्वीही प्रवास केला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.