विदेशी कंपनीच्या बोगस घड्याळाची विक्री करुन फसवणुक

साडेतीन कोटीच्या घड्याळासह पाच व्यापार्‍यांना अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
29 मे 2025
मुंबई, – नामांकित विदेशी कंपनीच्या बोगस घड्याळाची विक्री करुन कंपनीसह ग्राहकांची फसवणुक करणार्‍या एका टोळीचा आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत पाच व्यापार्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुनाफ अब्दुल कादिर घोघारी, जगदीश तगाराम पुरोहित, मंगलराम सरेमलजी पुरोहित, अहमद उमर हलाई आणि हितेश पुखराजभाई पुरोहित अशी या पाचजणांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी विविध विदेशी नामांकित कंपनीचे 1 हजार 482 बोगस घड्याळ जप्त केली असून त्याची किंमत सुमारे साडेतीन कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्याविरुद्ध स्वामीत्व हक्कांचे उल्लघन करुन नामांकित कंपनीच्या बोगस विदेशी घड्याळाची विक्री केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर या पाचजणांना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

महेश विष्णू कांबळे हे मूळचे पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातील रहिवाशी आहे. ते एका खाजगी नामांकित कंपनीत कामाला असून या कंपनीच्या विदेशी घड्याळांना मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे. त्यांच्या कंपनीच्या बोगस घड्याळांची अलसबा मार्केटमध्ये काही व्यापारी विक्री करुन कंपनीसह ग्राहकांची फसवणुक करत असल्याची माहिती महेश कांबळे यांना मिळाली होती. या माहितीनंतर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत संंबंधित व्यापार्‍याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने अलसबा मार्केटच्या शॉप क्रमांक 123, 124, 125, 131 आणि 135 मध्ये अचानक छापा टाकला होता.

या कारवाईत पोलिसांनी लोंगिन्स, रॅडो, ऑडमर्स पिगेट आणि कॅसीओ आदी नामांकित कंपनीचे स्वामीत्व हक्कांचे उल्लघंन करुन तयार करण्यात आलेल्या बोगस घड्याळाचा साठा जप्त केला आहे. 1 हजार 482 घड्याळाची किंमत सुमारे साडेतीन कोटी रुपये आहे. जप्त केलेले घड्याळ बोगस असल्याची माहिती असताना आरोपी व्यापारी संबंधित घड्याळ विदेशी कंपनीचे असल्याचे सांगून कमी किंमत ग्राहकांना विक्री करत होते. अशा प्रकारे या व्यापार्‍यांनी ग्राहकासह कंपनीची फसवणुक केली होती. याच गुन्ह्यांत नंतर मुनाफ घोघारी, जगदीश पुरोहित, मंगलराम पुरोहित, अहमद हलाई आणि हितेश पुरोहित या पाच व्यापार्‍यांना पोलिसांनी अटक केली.

त्यांच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. अटकेनंतर पाचही आरोपींना गुरुवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही व्यापार्‍यांचे नाव समोर आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page