बोगस वर्क ऑर्डर दाखवून व्यावसायिकाची साडेदहा लाखांची फसवणुक
दिड वर्षांपासून वॉण्टेड आरोपीस मुख्य आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० मार्च २०२४
मुंबई, – चिमनी डेमोलिशनचे सुमारे ६३ लाखांचे कंत्राटाचे बोगस वर्क ऑर्डर दाखवून एका व्यावसायिकाची सुमारे साडेदहा लाखांची फसवणुक केल्याच्या कटातील सर्फराज मलिक या मुख्य आरोपीस साकिनाका पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच सर्फराज हा पळून गेला होता. गेल्या दिड वर्षांपासून त्याचा पोलीस शोध घेत होते, अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
नईम मंगरुल्ला खान हे साकिनाका येथे राहत असून ते डेमोलिशन कॉन्ट्रक्टर म्हणून काम करतात. एप्रिल २०२१ रोजी त्यांच्या परिचित सर्फराजने त्यांना त्याची एक खाजगी कंपनी असून ही कंपनी इमारतीच्या डेमोलिशन तसेच स्क्रपचा व्यवसाय करते. मोबीन चौधरी हा त्याचा पार्टनर असून त्यांच्या कंपनीला राजस्थानच्या पाली, जैतरन येथील श्री सिमेंट लिमिटेड कंपनीचे चिमनी डिमोलेशनचे काम करण्याचे सुमारे ६३ लाख रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. या कामाची वर्क ऑर्डर कॉपी दाखवून त्याने त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. काम सुरु करण्यापूर्वी कंपनीला सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून १५ लाख रुपये भरावे लागणार आहे. त्यामुळे त्यांनी त्याला मदत करावी, पेमेंट आल्यानंतर त्याला ५० टक्के कमिशन देण्याचे मान्य केले होते. हा व्यवहार फायद्याचा होता, त्यामुळे नईम खान यांनी त्याला आर्थिक मदत करण्याचे ठरविले होते.
ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला साडेदहा लाख रुपये आरटीजीएसद्वारे पाठवून दिले होते. त्यानंतर त्यांच्यात एक करार झाला होता. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने कामाला सुरुवात केली नव्हती. याबाबत विचारणा केल्यानंतर तो आणखीन तीन ते चार महिने लागणार आहे असे सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत श्री सिमेंट लिमिटेड कंपनीला नोटीस पाठविली होती. यावेळी त्यांनी नोटीससोबत जोडलेल्या वर्क ऑर्डर कंत्राटाची कॉपी बोगस असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
बोगस वर्क ऑर्डर दाखवून सर्फराज व त्याचा पार्टनर मोबीन चौधरी यांनी त्यांची साडेदहा लाखांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र त्यांनी पैसे परत केले नाही. त्यामुळे त्यांनी ऑक्टोंबर २०२२ रोजी या दोघांविरुद्ध साकिनाका पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मोबीन आणि सर्फराजविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. याच गुन्ह्यांत गेल्या दोन वर्षांपासून सर्फराज हा फरार होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला तीन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.