खरेदी केलेल्या फ्लॅटची विक्री करुन ७५ लाखांची फसवणुक

वयोवृद्ध महिलेच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ ऑगस्ट २०२४
मुंबई, – खरेदी केलेल्या फ्लॅटची दुसर्‍या व्यक्तीला परस्पर विक्री करुन एका ७५ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची सुमारे ७५ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार काळाचौकी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी राकेश रामचंद्र सावंत या आरोपीविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. राकेश हा तक्रारदार महिलेच्या मुलाचा मित्र असून त्याने स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगून दिड वर्षांत फ्लॅटसाठी ७५ लाख रुपये घेऊन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

वंदना विष्णू घोले (७५) ही वयोवृद्ध महिला तिचे पती विष्णू, तीन मुले राकेश, प्रविण आणि नितिनसोबत काळाचौकी परिसरात राहते. राकेश आणि नितीन यांचा स्वतचा व्यवसाय आहे तर प्रविण हा खाजगी कंपनीत कामाला आहे. नितीन वगळता इतर दोन्ही मुलांनी स्वतचे घर घेतले आहे. त्यामुळे नितीनसाठी ती याच परिसरात घराचा शोध घेत होती. राकेश हा तिचा मुलगा प्रविण मुलगा असून घराबाबत त्यालाही माहिती होती. याच परिसरातील यशोधन सहकारी सोसायटीच्या पुर्नविकास प्रकल्पात राकेश हा सेक्रेटरी म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याने घर घेण्यासाठी त्यांना मदत करण्याचे आश्‍वासन दिले होते. यावेळ त्याने त्याचा स्वत फ्लॅट विक्रीसाठी असल्याचे सांगून त्यांना स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगितले होते. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी त्याच्या फ्लॅटची पाहणी केली होती. फ्लॅट आवडल्याने त्यांनी तोच फ्लॅट विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. चर्चेअंती त्यांच्यात फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा ७५ लाखांमध्ये सौदा पक्का झाला होता. त्यामुळे घोले कुटुंबियांनी त्याला दिड वर्षांत संपूर्ण पेमेंट करण्याचे आश्‍वासन दिले होते. याच दरम्यान यशोधन सोसायटीच्या पुर्नविकासाचे काम सुरु झाले होते. ठरल्याप्रमाणे गेल्या दोन वर्षांत त्यांनी राकेश सावंतला सुमारे ७५ लाख रुपये दिले होते. त्यापैकी ३४ लाख ५० हजार कॅश तर उर्वरित धनादेशद्वारे देण्यात आले होते.

मार्च २०२३ रोजी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सर्व सभासदांना विकासकाकडून फ्लॅटच्या चावीचे वाटप करण्यात आले होते. मात्र त्यांच्या फ्लॅटची चावी त्यांना न देता विकासकाने राकेश सावंतला दिली होती. याबाबत राकेशकडे विचारणा केल्यानंतर त्याने फ्लॅटचा ताबा देण्यास टाळाटाळ सुरु केली होती. त्यामुळे त्यांनी फ्लॅटचा ताबा दे नाहीतर फ्लॅटसाठी घेतलेले ७५ लाख रुपये परत करण्यास सांगितले. मात्र त्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा पैसेही परत केले नाही. याच कालावधीत त्याने फ्लॅटची परस्पर दुसर्‍या व्यक्तीला विक्री करुन घोले कुटुंबियांची फसवणुक केली होती. तीन महिने सतत पाठपुरावा करुनही त्याने पेमेंट परत केले नाही. त्याने दिलेले दोन्ही धनादेश बँक न वटता परत आले होते. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच वंदना घोले यांनी काळाचौकी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून राकेश सावंतविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध ४०६, ४२० भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page