बँकेचे कर्जासह भाडेकरु असताना फ्लॅटची विक्री करुन फसवणुक

बोरिवलीतील आरोपी पती-पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 फेब्रुवारी 2026
मुंबई, – भाडेकरु म्हणून राहत असलेल्या फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करताना फ्लॅटवर एका खाजगी बँकेचे 35 गृहकर्जाची माहिती लपवून एका आरोपी जोडप्याने सुमारे 60 लाखांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी गणेश केशव रहाटे आणि सविता गणेश रहाटे या पती-पत्नीविरुद्ध बोरिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या दोघांविरुद्ध दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात खटला सुरु असून त्याची नियमित सुनावणी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने रहाटे पती-पत्नीची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रसाद विजय साटम हे मूळचे सिंधुदुर्गचे रहिवाशी असून सध्या ते त्यांच्या वयोवृद्ध आई-वडिल, पत्नीसोबत बोरिवली परिसरात राहतात. खार येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ते जनरल मॅनेजर म्हणून कामाला आहेत. त्यांची मेहुणी स्नेहा विठ्ठल धुरी आणि साडू अक्षय उमेश गोलतकर हे परळ येथे राहत असून सध्या ते दोघेही दुबईत नोकरी करतात. जुलै 2022 रोजी या दोघांची गणेश आणि त्याची पत्नी सविताशी ओळख झाली होती. त्यांच्या मालकीचा बोरिवलीतील न्यू एमएचबी कॉलनीत समृद्धी सहकारी सोसायटीमध्ये एक फ्लॅट होता. या फ्लॅटचा व्यवहार त्यांनी स्नेहा आणि अक्षय यांच्यासोबत केला होता. फ्लॅटसाठी त्यांनी त्यांना 55 लाख रुपये तर सोसायटीचे मेंन्टेन्ससह इतर करासाठी पाच लाख रुपये दिले होते.

सप्टेंबर 2022 रोजी करारनामा झाल्यानंतर त्यांनी त्यांना लवकरच फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच ते त्यांच्या फ्लॅटमध्ये गेले होते. यावेळी त्यांना तिथे बाळकृष्ण विश्वासराव हे राहत असल्याचे समजले होते. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी तेच फ्लॅटचे मालक असल्याचे सांगितले. गणेश रहाटेविषयी चौकशी केल्यानंतर त्यांच्या फ्लॅटमध्ये तो त्याच्या पत्नीसोबत भाडेकरु म्हणून राहत होता. त्याने बाळकृष्ण विश्वासराव यांच्याकडून फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता.

मात्र आर्थिक व्यवहार पूर्ण न झाल्याने त्यांनी त्याला फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. तपासात गणेश रहाटे याने फ्लॅटसाठी एका खाजगी बँकेतून 35 लाखांचे गृहकर्ज घेतले होते. अशा प्रकारे कर्ज असलेला तसेच स्वत भाडेकरु म्हणून राहत असताना त्याने स्नेहा धुरी आणि अक्षय गोलतकर यांच्यासोबत फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन, बँकेतून कर्ज घेतल्याची माहिती लपवून त्यांची 60 लाख रुपयांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी गणेश रहाटे आणि सविता रहाटे यांच्याविरुद्ध गोरेगाव येथील दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात एक याचिका सादर केली होती. त्याची नियमित सुनावणी कोर्टात सुरु आहे.

याच दरम्यान स्नेहा धुरी आणि अक्षय गोलतकर यांच्या वतीने प्रसाद साटम यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गणेश रहाटे आणि सविता रहाटे या पती-पत्नीविरुद्ध पोलिसांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे 60 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. या दोघांनाही लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page