अभिनेता फरहान अख्तरच्या चालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पेट्रोल-डिझेल भरल्याची खोटी नोंद करुन बारा लाखांची फसवणुक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – गेल्या तीन वर्षांत पेट्रोल आणि डिझेल भरल्याची खोटी नोंद करुन क्रेडिट कार्ड स्वाईप करुन सुमारे बारा लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी नरेश रामविनोद सिंग आणि अरुण अमरबहादूर सिंग या दोघांविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील नरेश हा सिनेअभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरचा कारचालक तर अरुण सिंग हा पेट्रोलपंपावर काम करणारा त्याचा सहकारी असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या दोघांनी संगनमत करुन बारा लाखांचा अपहार करुन फरहान अख्तरची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

दिया बंटी भाटिया ही महिला वांद्रे येथे राहते. ती गेल्या तीन वर्षांपासून सिनेअभिनेता-निर्माता फरहान अख्तर आणि त्याची आई हनी नोशिर इराणी यांची मॅनेजर म्हणून काम करते. त्यांच्याकडे दोन कारचालक असून त्यात नरेश सिंग याचा समावेश होता.28 सप्टेंबरला ती दोन्ही कारच्या पेट्रोल-डिझेलच्या अकाऊंटची पाहणी करत होती. यावेळी तिला ए स्टार मारुती कारच्या पेट्रोल टॅकची क्षमता 35 लिटर असताना त्यात 62 लिटर पेट्रोल भरल्याचे दिसून आले.

हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने कारचा चालक नरेश सिंग याच्याकडे विचारणा केली होती. यावेळी तो प्रचंड घाबरला होता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे देऊन तिला टाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. त्यात नरेश सिंग हा तीन कार्डवरुन जवळच्या एचपी पेट्रोल पंपावरुन पेट्रोल भरत असल्याचे दिसून आले. गेल्या तीन वर्षांपासून नरेश सिंगकडे पेट्रोल भरण्यासाठी तीन कार्ड देण्यात आले होते. या कालावधीत त्याने त्याचा पेट्रोलपंपाचा मित्र अरुण सिंग याच्या मदतीने ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले. तोच अरुण सिंगला फरहान अख्तरचे कार्ड देत होता. त्यानंतर तो अतिरिक्त पेट्रोल-डिझेल भरल्याचे भासवून कार्ड स्वाईप करुन ही फसवणुक करत होता. त्यानंतर ही रक्कम तो नरेशला कॅश स्वरुपात देत होता. या रक्कमेनंतर नरेश हा अरुणला प्रत्येक व्यवहारानंतर एक ते दिड हजार रुपयांचे कमिशन देत होता.

गेल्या तीन वर्षांत या दोघांनी पेट्रोल-डिझेलमध्ये सुमारे बारा लाखांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे फरहान अख्तरने त्यांची एक कार सात वर्षांपूर्वी विक्री केली होती. या कारमध्येही पेट्रोल भरल्याची त्यांनी नोंद केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच दिया भाटिया हिने हा प्रकार फरहान अख्तर आणि हनी इराणी यांना सांगितला होता. त्यांनी तिला दोन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने त्यांच्या वतीने वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नरेश सिंग आणि अरुण सिग यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page