दादर येथे २३ वर्षांच्या तरुणीवर पित्याकडून प्राणघातक हल्ला
मद्यप्राशन केलेल्या पित्याला जाब विचारणे महागात पडले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ एप्रिल २०२४
मुंबई, – दादर येथे एका २३ वर्षांच्या तरुणीवर तिच्याच पित्याने भाजी कापण्याच्या सुरीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात वैभवी सतीश धुरी हिच्या पोटाला गंभीर दुखापत झाल्याने तिला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंद करुन दादर पोलिसांनी आरोपी पिता सतीश सूर्यकांत धुरी (६०) याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी भोईवाडा येथील लोकल कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मद्यप्राशन केलेल्या पित्याला जाब विचारणे या तरुणीला चांगलेच महागात पडले आहे.
ही घटना शुक्रवारी दुपारी पावणेदोन वाजता दादर येथील गोखले रोड, सुदर्शन इमारतीमध्ये घडली. याच इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ३१२ मध्ये सतीश धुरी हा त्याची मुलगी वैभवीसोबत राहतो. तो महिंद्रा कंपनीतून निवृत्त झाला असून त्याच्या पत्नीचे निधन झाले आहे. वैभवी ही आजारी असल्याने तिच्यावर एका खाजगी डॉक्टरकडून औषधोपचार सुरु आहेत. सतीशला दारु पिण्याचे व्यसन होते. याच कारणावरुन वैभवी आणि सतीश यांच्यात सतत वाद होत होते. अनेकदा सतीश दारु पिणे सोडून देत होता आणि नंतर पुन्हा दारु पिण्यास सुरुवात करत होता. दारु पिण्यावरुन त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. शुक्रवारी ५ एप्रिलला सतीश नेहमीप्रमाणे मद्यप्राशन करुन घरी आला होता. यावेळी दारुच्या नशेत वडिलांना पाहिल्यांनतर वैभवीने त्याच्याशी वाद घातला होता. त्यातून त्याने तिला शिवीगाळ करुन तुला आता जिवंत सोडत नाही असे सांगून किचनमधून सुरी आणली. काही कळण्यापूर्वीच त्याने तिच्या पोटावर सुरीने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात वैभवी ही गंभीररीत्या जखमी झाली. हा प्रकार समजताच स्थानिक रहिवाशांनी ही माहिती दादर पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या वैभवीला तातडीने केईएम रुग्णालयात दाखल केले. तिथेच तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे. तिची पोलिसाकडून जबानी नोंदविण्यात आली असून या जबानीनंतर सतीश धुरीविरुद्ध पोलिसांनी शिवीगाळ करुन हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर शनिवारी त्याला भोईवाडा येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवार ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.