पत्नी घरी येत नाही म्हणून चार वर्षांच्या मुलीला मारहाण

मारहाण करणार्‍या पित्याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 मार्च 2025
मुंबई, – कौटुंबिक वादानंतर घर सोडून गेलेली पत्नी घरी येत नाही म्हणून रागाच्या भरात एका व्यक्तीने त्याच्याच चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण करुन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत मुलीच्या डोक्याला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर शासकीय हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपी पतीविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

40 वर्षांची तक्रारदार महिला ही गेल्या पंधरा वर्षांपासून अंबरनाथ येथे राहते. तिचे गोरख नावाच्या एका व्यक्तीसोबत दुसरे लग्न झाले होते. त्यांना पाच वर्षांचा एक मुलगा आणि चार वर्षांची एक मुलगी आहे. या महिलेचे पहिले लग्न झाले असून पहिल्या पतीपासून तिला चार मुले आहेत. पतीच्या निधनानंतर तिने तिच्या चारही मुलांना होस्टेलमध्ये ठेवले होते. सर्व काही सुरळीत सुरु असताना तिला गोरखने दुसरे लग्न केल्याचे समजले होते. तेव्हापासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होता. या वादाला कंटाळून ती घर सोडून निघाली होती. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या दोन्ही मुलांसोबत दादर येथील डॉ. बी ए रोडवर फुटपाथवर राहत होती. दादर फुलमार्केटमधून माल आणून ती हार विक्रीचे काम करत होती.

27 मार्चला दुपारी तिच्या मुलीला एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यासोबत नेले होते. ही माहिती एका महिलेकडून तिला समजताच तिने तिच्या मुलीचा शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. तिला तिच्या वडिलांनी स्वतसोबत नेले असावे म्हणून ती अंबरनाथला गेली होती. मात्र तिच्या पतीने तिला मुलीबाबत काहीच माहिती दिली नाही. याच दरम्यान तिला भोईवाडा पोलिसांचा फोन आला होता. तिची मुलगी पोलिसांना सापडल्याचे समजताच ती तिथे गेली होती. यावेळी तिच्या मुलीच्या डोक्याला आणि नाकाला दुखापत झाल्याचे दिसून आले. तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर गोरखनेच तिला मारहाण केल्याचे समजले. त्यामुळे तिने तिला केईएम हॉस्पिटलमध्ये नेले होते.

तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर ती भोईवाडा पोलीस ठाण्यात आली आणि तिने घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगून पतीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि अल्पवयीन न्याय अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. कौटुंबिक वादातून घर सोडून गेलेली पत्नी पुन्हा घरी येत नाही म्हणून रागाच्या भरात गोरखने त्याच्या चार वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page