अकरा वर्षांच्या मुलाला पित्याकडून लाथ्याबुक्यांनी मारहाण
दारुच्या नशेत मारहाण करणार्या पित्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 एपिल 2025
मुंबई, – पत्नीसोबत झालेल्या क्षुल्लक वादातून पत्नीचा पतीने त्याच्याच अकरा वर्षांच्या मुलावर काढल्याची घटना वांद्रे येथील बीकेसी परिसरात उघडकीस आली आहे. लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केल्याने मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर भाभा हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहे. याप्रकणी मद्यपी पित्याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
35 वर्षांची तक्रारदार महिला तिच्या पती आणि चार मुलांसोबत वांद्रे येथील बीकेसी परिसरात राहते. ती घरकाम करते तर तिचा पती काहीच कामधंदा करत नाही. त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. पती काहीच कामधंदा न करता तिच्याकडून पैसे घेऊन दारु पित असल्याने त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. गुरुवारी 10 एप्रिलला दुपारी बारा वाजता तिचा पती नेहमीप्रमाणे मद्यप्राशन करुन घरी आला होता. यावेळी त्याने तिच्याशी क्षुल्लक कारणावरुन वाद घालण्यास सुरुवात केली. तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे ती घाबरुन घरातून बाहेर निघून गेली होती.
काही वेळानंतर ती पुन्हा घरी आली होती. यावेळी रागाच्या भरात त्याने तिच्यासमोरच तिच्या अकरा वर्षांच्या लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यात त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर ती प्रचंड घाबरली आणि तिने पोलिसांना कॉल करुन मदतीसाठी विनंती केली होती. ही माहिती मिळताच बीकेसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी या महिलेने घडलेला प्रकार पोलिसांना सांगून तिच्या पतीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनतर आरोपी पतीविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता तसेच अल्पवयीन न्याय कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मारहाणीत अकरा वर्षांचा मुलगा जखमी झाल्याने त्याला जवळच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी आरोपी पित्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.