मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – तिळाचे लाडू दिले म्हणून पित्यानेच त्याच्या नऊ वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अतिश नावाच्या ४० वर्षांच्या आरोपी पित्याविरुद्ध कुरार व्हिलेज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपी पित्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
ही घटना रविवारी सायंकाळी चार वाजता मालाड येथील कुरार व्हिलेज, तानाजीनगर परिसरात घडली. याच परिसरात ३८ वर्षांची तक्रारदार तिचा पती, सासरे आणि नऊ वर्षांची मुलीसोबत राहते. ती तिच्या पतीसोबत मजुरीचे काम करते. तिच्य पतीचा स्वभाव प्रचंड रागीट असून क्षुल्लक कारणावरुन तो तिच्यासह तिच्या नऊ वर्षांच्या मुलीवर चिडचिड करुन शिवीगाळ करतो. रविवारी सायंकाळी चार वाजता तिच्या मुलीने तिळाचे लाडू आणले होते, ते लाडू तिने तिच्या वडिलांना दिले. त्याचा राग आल्याने त्याने तिला बेदम मारहाण केली. तिला बेडवर आपटले. पाठीत बुक्का मारला. तिच्य पायाला आणि पाठीला कमरेला पट्ट्याने बेदम मारहाण केी होती. तिने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने तिलाही शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. काही वेळानंतर त्याने स्वतच्या मुलीला घरातून बाहेर काढले होते.
या मारहाणीत मुलीला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तिने तिला कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेले होते. तिथेच तिच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. लाडू दिले म्हणून तिच्या पतीने मुलीला बेदम मारहाण केल्याने तिने कुरार व्हिलेज पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी पतीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपी पिताविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि अल्पवयीन न्याय कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपी पित्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रविवारी सायंकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.