मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 जून 2025
मुंबई, – हुंड्यासाठी पत्नीचा मानसिक व शारीरिक शोषण करुन, पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसर्या महिलेशी विवाह करुन पत्नीची फसवणुक तसेच तिच्या स्त्रीधनाचा अपहार केल्याप्रकरणी तोतया सीबीआय पतीसह सासर्याला समतानगर पोलिसांनी अटक केली. पंकज हनुमंत देगलूरकर आणि हनुमंत गंगाराम देगलूरकर अशी या पिता-पूत्राची नाव असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत सासू लिना हनुमंत देगलूरकर, चुलते वसंत गंगाराम देगलूरकर, जयवंत गंगाराम देगलूरकर, पंकजची काकी विनिता वसंत देगलूरकर, रेणुका जयवंत देगलूरकर, भाऊ हर्षल हनुमंत देगलूरकर हे सहाजण सहआरोपी असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
25 वर्षांची रागिनी पंकज देगलूरकर ही कांदिवली परिसरात तिच्या आई-वडिल, भाऊ आणि साडेतीन वर्षांच्या मुलासोबत राहते. तिचे वडिल सिव्हिल कॉन्स्ट्रक्टर असून तिचे बीएडीएडपर्यंत शिक्षण झाले आहेत. 2019 साली तिला पंकजचे स्थळ आले होते. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी पंकज हा सीबीआयमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी त्याचे ओळखपत्र दाखविले होते. दोन्ही कुटुंबियांनी सविस्तर चर्चा केल्यानंतर 1 डिसेंबर 2019 रोजी पंकज आणि रागिनी यांचा बोरिवली येथे पारंपारिक पद्धतीने विवाह झाला होता. लग्नापूर्वी रागिनीच्या वडिलांनी देगलूरकर कुटुंबियांना सुमारे सोळा लाख रुपये हुंडा म्हणून दिला होता. इतकेच नव्हे तर त्यांनी लग्नात सुमारे 40 लाख रुपये खर्च केला होता. तसेच रागिनीला लग्नात सुमारे साडेपाच लाखांचे दागिने दिले होते. मुलगा सीबीआय अधिकारी आहे, मुलगी सुखात राहील हा विचार करुन तिच्या वडिलांनी लग्नात काहीही कमी पडणार नाही याची काळजी घेतली होती. त्यासाठी त्यांनी बँकेतून कर्ज काढले होते.
लग्नानंतर रागिणी ही कल्याण येथील सासरी निघून गेली होती. मात्र काही दिवसांत तिचा सासरच्या मंडळीनी छळ सुरु केला होता. लग्नात मानपान केला नाही, संसार साहित्य दिले नाही म्हणून तिला टोमणे मारले जात होते. क्षुल्लक कारणावरुन तिचा मानसिक छळ सुरु होता. स्वयपाक येत नाही, घरातील काम येत नाही तिला टोमणे मारुन अपमानित केले जात होते. अनेकदा तिला मारहाण आणि दमदाटी केली जात होती. लग्नानंतर पंकज हा घरीच राहत होता. तो तिला फळ-भाजी विक्रीचा व्यवसाय सुरु कर असे सांगत होता. याच दरम्यान तिला पंकज हा सीबीआय अधिकारी नाही. तो काहीच कामधंदा करत नव्हता.
देगलूरकर कुटुंबियांनी लग्नापूर्वी मुलगा सीबीआय अधिकारी असल्याचे खोटे सांगितले होते. याबाबत विचारणा केल्यानंतर त्याचे काम गोपनीय असते, त्यामुळे तो कोणालाही काही सांगत नाही. त्याच्या कामाची निश्चित वेळ नसते असे सांगत होता. तिचा विश्वास बसावा म्हणून त्याने तिला वांद्रे आणि एनपीटी येथे त्याचे कार्यालय असल्याचे दाखविले होते. ऑगस्ट 2020 रोजी पंकजने त्याची बंगलोर येथे बदली झाल्याचे सांगून तिथे फ्लॅट खरेदीसाठी तिच्या कुटुंबियांकडून 50 लाख रुपये आणावेत म्हणून दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.
तिच्या आई-वडिलांनी 50 लाख रुपये देण्यास नकार दिला म्हणून पकंजने तिचा मानसिक व शारिरिक छळ सुरु केला होता. तिच्या वडिलांचा फोन आल्यानंतर पंकजने तिला मोबाईल फेंकून मारला होता. त्यात तिच्या डोळ्याला दुखापत झाल होती. तरीही सासरचे मंडळी तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होते. हा प्रकार तिने वडिलांना सांगितला असता त्यांनाही त्यांनी शिवीगाळ करुन दमदाटी केली होती. त्यांना अपमानित करुन घरातून बाहेर हाकलूनदिले होते. तसेच मुलगी मुलगी आमच्या घरातील घाण असून तिला घेऊन जा असे सांगिले. त्यामुळे जानेवारी 2021 साली ती तिच्या घरी निघून आली. फेब्रुवारी 2021 रोजी ती गरोदर असल्याचे समजजाच पंकजने सर्वांची माफी मागून तिला घरी आणले होते. मात्र सासरी आल्यानंतर तिचा छळ कमी झाला नव्हता. गरोदरपणात तिचा सर्व खर्च तिच्या आई-वडिलांनी केला होता.
जून 2022 रोजी रागिनी ही पंकजसोबत नागपूर येथे राहत होती. यावेळी तिला आकांक्षा बहादुरे या महिलेचे काही मॅसेज दिसले होते. याबाबत तिने आकांक्षाकडे विचारणा केल्यानंतर तिने त्याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. ते दोघेही हॉटेल, पब, क्लब आणि पार्कमध्ये जात असल्याचे काही फोटो पाठविले होते. काही दिवसांनी तिला या दोघांनी लग्न केल्याचे समजले होते. मे 2024 रोजी तिला आकांक्षाचे डोहाळ जेवणाचे काही फोटो दिसले होते. त्यात तिच्यासोबत पंकज हादेखील होता. तिच्यासोबत घटस्फोट घेतला नसताना पंकजने आकांक्षासोबत दुसरे लग्न केले होते. याच दरम्यान देगलूकर कुटुंबियांनी कल्याण येथे फ्लॅट विकून दुसरीकडे राहण्यासाठी गेले होते. या सर्वांनी तिची फसवणुक केली होती. तिच्या स्त्रीधनाचा अपहार केला होता.
पंकज तिच्यासोबत राहत असताना त्याने दुसरे लग्न केले होते. त्यामुळे एक वर्षांपूर्वी ती पंकजचे घर सोडून तिच्या आई-वडिलांकडे राहण्यासाठी आली होती. आई-वडिलांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर तिने समतानगर पोलिसांत देगलूरकर कुटुंबियांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिच्या पतीसह आठजणांविरुद्ध 115 (2), 3 (5), 316 (2), 318 (2), (4), 336 (2), 340 (2), 351 (2), (3), 352, 82 (1), 85 भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु होता.
तपासादरम्यान रागिनीच्या आरोपात तथ्य असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेला तोतया सीबीआय अधिकारी पंकज देगलूरकर व त्याचे वडिल हनुमंत देगलूरकर या दोघांना दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत इतर सहाजणांचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांचीही लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होणार आहे.