मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 ऑगस्ट 2025
मुंबई, – मुलीच्या शिक्षणासाठी केलेल्या एफडीवर कर्ज काढून एका 58 वर्षांच्या महिलेची 2 लाख 78 हजार रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी एका मुख्य आरोपीस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. प्रकाश धनंजय खत्री असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यांत त्याला इतर काही आरोपींनी मदत केल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
58 वर्षांची तक्रारदार महिला तिच्या वयोवृद्ध पती आणि सतरा वर्षांच्या मुलीसोबत मालाड परिसरात राहते. ती घरकाम करते तर तिचे पती मनपामधून निवृत्त झाले आहेत. तिची मुलगी शिक्षण घेत असल्याने तिने तिच्या शिक्षणासाठी काही रक्कम बचत करुन दोन आणि एक लाख रुपयांचे प्रत्येकी दोन एफडी काढले होते. 21 जूनला ती तिच्या कामात होती, यावेळी तिला तिच्या बँकेतून काही मॅसेज आले होते. हा मॅसेज तिने तिच्या पतीला पाठविला होता. मॅसेजबाबत संशय निर्माण झाल्याने ते दोघेही दुसर्या दिवशी त्यांच्या बँकेत गेले होते. यावेळी तिला तिच्या एफडीवर काही अज्ञात व्यक्तीने कर्ज काढले होते.
तिच्या बँक खात्यातील कर्जाची रक्कम दुसर्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. अज्ञात व्यक्तीने या महिलेची कुठलीही परवानगी न घेता इंटरनेट बँकिंग सुविधा प्राप्त करुन कर्ज काढून कर्जाची रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केल्याचे तिला बँक कर्मचार्याकडून समजले होते. हा प्रकार उघडकीस येताच तिने बांगुरनगर पोलिसांना घडलेला प्रकार प्रकाश खत्रीसह इतर आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत संबंधित आरोपीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना कर्जाची रक्कम प्रकाश खत्री याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे तांत्रिक माहितीवरुन त्याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. प्रकाश खत्रीच्या चौकशीत या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला आहे, त्यामुळे त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.