चित्रपट निर्मितीसाठी २.६१ कोटीचा अपहार करुन फसवणुक
अंधेरीतील घटना; दोन महिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ जुलै २०२४
मुंबई, – चित्रपट निर्मितीसाठी घेतलेल्या २ कोटी ६१ लाख रुपयांचा अपहार करुन एका ५२ वर्षांच्या व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन महिलांसह तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. निलिमा सुकरामपाल शर्मा, रोहित शर्मा आणि अनिशा सुकरामपाल शर्मा अशी या तिघांची नावे असून या तिघांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कराराचे कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
ब्रम्हदेव रामगोविंद सिंग हे व्यापारी असून ते अंधेरी परिसरात राहतात. अंधेरीतील अंधेरी-कुर्ला रोड, ग्रेस चेंबर्समध्ये त्यांची कंपनी आहे. याच कंपनीत निलिमा शर्माने अनिशा शर्माला नोकरी मिळवून दिली होती. यावेळी तिला कंपनीच्या आर्थिक माहिती काढण्यास सांगण्यात आले होते. ही माहिती काढल्यानंतर निलिमा आणि रोहित शर्मा यांनी ब्रम्हदेव सिंग यांची त्यांच्याच कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. त्यांना निलिमाने ती राज्याभिषेक नावाच्या एका चित्रपटाची निर्मिती करत आहे. त्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्यांनी तिच्या चित्रपटात गुंतवणुक करावी. या गुंतवणुकीसह चित्रपटातून होणार्या नफ्यातून तिने त्यांना ५० टक्के परवाता देण्याचे आश्वासन देत त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. ही ऑफर चांगली वाटल्याने त्यांनी तिच्या चित्रपट निर्मितीमध्ये साडेतीन कोटीची गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांच्यात एक करार झाला होता. या करारानंतर त्यांनी निलिमा शर्मा आणि आणि रोहित शर्मा यांच्या बँक खात्यात २ कोटी ६१ लाख रुपये ट्रान्स्फर केले होते.
काही दिवसांनी त्यांनी त्यांच्याकडून कराराचे सर्व दस्तावेज काढून घेतले. करार रद्द केल्याचे बोगस दस्तावेज बनवून त्यांनी त्यांचे बोगस स्वाक्षरी केली होती. कराराच्या पहिले आणि शेवटचे पान सोडून इतर सर्व पाने आणि मजकूर जाणीवपूर्वक बदलले होते. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या मूळ कराराचे दस्तावेजाचे पुरावा नष्ट करुन चित्रपट निर्मितीसाठी घेतलेल्या २ कोटी ६१ लाखांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच ब्रम्हदेव सिंग यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी निलिमा शर्मा, रोहित शर्मा आणि अनिशा शर्मा या तिघांविरुद्ध ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४७१, १२० बी, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिन्ही आरोपींना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.