पाच वेगवेगळ्या अपघातात महिलेसह पाचजणांचा मृत्यू

मानखुर्द, विक्रोळी, गोरेगाव, दहिसर व सांताक्रुज येथील घटना

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ मार्च २०२४
मुंबई, – शनिवारी व रविवारी झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातात एका महिलेसह चौघांचा मृत्यू झाला तर अपघाताच्या एका घटनेत जखमी झालेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पाचही अपघात दहिसर, मानखुर्द, दहिसर, विक्रोळी, गोरेगाव आणि सांताक्रुज परिसरात झाले. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पाच स्वतंत्र अपघाताची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

पहिला अपघात रविवारी ३ मार्चला सकाळी नऊ वाजता विक्रोळीतील पूर्व दुतग्रती महामार्गावरील गोदरेज येथून सोफ गेटचा सिग्नल, मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणार्‍या वाहिनीवर झाला. रामचरण बुधई गौतम हे रिक्षाचालक असून घाटकोपर येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ३८ वर्षांचा अजयकुमार हा त्यांचा मुलगा असून तोदेखील रिक्षाचालक म्हणून काम करतो. रविवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन घरातून निघाला होता. सकाळी नऊ वाजता गोदरेज सोफ गेटजवळ एका भरवेगात जाणार्‍या कारची धडक लागून तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला विक्रोळी पोलिसांनी आंबेडकर रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी रामचरण गौतम यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारचालक सुरज अरुण जगताप याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.

दुसरा अपघात रविवारी दुपारी अडीच वाजता गोरेगाव येथील पश्‍चिम दुतग्रती महामार्गावरील मृणालताई ब्रिजवर झाला. अल्ताफ हनीफ अगवान हा नालासोपारा येथे राहत त्याचा टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्सचा व्यवसाय आहे. रविवारी दुपारी एक वाजता तो त्याची पत्नी नाझसोबत माहीम दर्गा येथे कारने दर्शनासाठी निघाला होता. ही कार दुपारी अडीच वाजता मृणालताई ब्रिजवरुन जात होती. यावेळी त्यांच्या कारला अन्य एका आयशर कारने जोरात धडक दिली. या अपघातात अल्ताफ व नाझ हे दोघेही जखमी झाले होते. जखमींना तातडीने जोगेश्‍वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे नाझला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर अल्ताफवर उपचार सुरु आहे. अपघातात त्याच्या पायाला, हाताला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर कारचा चालक कार तिथेच टाकून पळून गेला होता. याप्रकरणी वनराई पोलिसांनी अपघाताची नोंद करुन पळून गेलेल्या कारचालकाचा शोध सुरु केला आहे.

तिसरा अपघात रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजता मानखुर्द येथील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, नटपारीख कंपाऊंडजवळील ब्रिजवर झाला. रविवारी सायंकाळी मानखुर्द पोलिसांना मुख्य नियंत्रण कक्षातून नटपारीख कंपाऊंडजवळ अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलीस तिथे गेले होते. घटनास्थळी पोलिसांना सोहम रेडकर हा २१ वर्षांचा बाईकस्वार जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आला. त्यामुळे त्याला पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्याला पोलिसांनी मृत घोषित केले. प्राथमिक तपासात सोहम हा बोरिवलीतील अशोकवन, धु्रव सोसायटीमध्ये राहतो. रविवारी तो मानखुर्द येथून त्याच्या बाईकवरुन जात होता. भरवेगात बाईक चालविण्याच्या नादात त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि त्याने डिवायडरला धडक दिली. त्यात फरफटत गेल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या अपघाताला सोहमच जबाबदार असल्याने त्याच्याविरुद्ध मानखुर्द पोलिसांनी हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.

चौथा अपघात शनिवारी रात्री पावणेअकरा वाजता दहिसर येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, चेकनाक्याच्या दक्षिण वाहिनीवर झाला. शिवम शिवकुमार हा तरुण त्याच्या कुटुंबियांसोबत कांदिवलीतील सिंह इस्टेटमध्ये राहतो. त्याचे वडिल शिवकुमार सिंह यांच्या मालकीची फर्स्ट बेस्ट इंडियन सिक्युरिटी नावाची एक कंपनी आहे. शनिवारी रात्री साडेआठ वाजता शिवकुमार हे कामानिमित्त त्यांच्या कंपनीचा कर्मचारी बिपीनकुमार रामप्रताप पांडेसोबत त्याच्या स्कूटीवरुन नायगाव येथे गेले होते. काम संपल्यानंतर ते दोघेही पावणेअकरा वाजता दहिसर चेकनाक्याच्या दिशेने येत होते. यावेळी एका टेम्पोने त्यांच्या स्कूटीला धडक दिली होती. त्यात टेम्पोच्या चाकाखाली आल्याने शिवकुमार हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांना जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या अपघतााला जबाबदार असलेल्या इफ्तिकार इक्बाल शेख याला नंतर पोलिसांनी अटक केली.

अन्य एका अपघाताच्या घटनेत गंभीररीत्या जखमी झालेल्या गोरख कुशवाह या ३८ वर्षांच्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २१ फेब्रुवारीला राजेश रामआशिष गुप्ता हा त्याचा मित्र गोरख कुशवाह याच्यासोबत त्याच्या बाईकवरुन दादरला जात होते. ही बाईक चार वाजता वाकोला ब्रिजवर येताच राजेशचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि त्याने डिवायडरला जोरात धडक दिली होती. त्यात ते दोघेही जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच वाकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. गोरखची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला नंतर शीव रुग्णालयात हलविण्यात आले होते. शनिवारी २ मार्चला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी राजेश रामआशिष गुप्ताविरुद्ध वाकोला पोलिसांनी हलगर्जीपणाने वाहन चालवून स्वतला दुखापत तर मित्राच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page