इतर राज्यातून आणलेल्या घातक शस्त्रांसह पाचजणांना अटक
तीन पिस्तूल, दोन गावठी कट्टे, दोन मॅगझीन व काडतुसे जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जानेवारी 2026
मुंबई, – इतर राज्यातून मुंबई शहरात आणलेल्या घातक शस्त्रांसह पाचजणांना स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. रेहान ऊर्फ रिहान फकरुद्दीन मलिक, मुश्ताक आलम अफरोज आलम इंद्रीसी, अरबाज जमील खान, संतोष अशोक शिर्के आणि शैलेश अशोक पवार अशी या पाचजणांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन देशी बनावटीचे पिस्तूल, दोन मॅगझीन, दोन गावठी कट्टे आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
नवीन वर्षांत मुंबई पोलिसांनी इतर राज्यातील आणलेल्या घातक शस्त्रांची मुंबई शहरात विक्री करणार्या आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना दिडोंशी पोलीस ठाण्याचे एपीआय भोसले, उपनिरीक्षक नितीन सवणे, पोलीस अंमलदार शिंदे, काळे यांनी गोरेगाव येथील शिवशाही मैदान परिसरातून शैलेश पवार या तरुणाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा, एक काडतुसे जप्त केले. शैलेश हा गोरेगाव येथे राहत असून बेरोजगार आहे.
युनिट बाराच्या अधिकार्यांनी संतोष शिर्के याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहे. संतोष हा मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात असून तो मजुरीचे काम करतो. मालाडच्या अशोक रुग्णालयाजवळील लक्ष्मणदास रेहजा मार्ग परिसरात तो शस्त्रांची विक्रीसाठी आला होता, मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली.
तिसर्या कारवाईत कुरार पोलिसांनी अरबाज खान या तरुणाला अटक केली. तो गोरेगाव येथील ए. के वैद्य मार्ग, रत्नागिरी हॉटेलसमोर शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कुरार पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून अरबाजला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. मुश्ताक हा गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात राहतो.
बुधवारी रात्री तो गोवंडीतील शिवाजीनगर, छत्रपती शाहू महाराज गार्डनजवळ घातक शस्त्रांची विक्रीसाठी आला होता. यावेळी तिथे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस शिपाई शेख आणि अभंग आदी पथक गस्त घालत होते, पोलिसांना पाहताच मुश्ताक हा पळू लागला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला शिताफीने ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझीन सापडले. चौकशीत त्याने पिस्तूलची विक्रीसाठी तिथे आल्याचे कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
दुसर्या कारवाईत रेहान ऊर्फ रिहान या आरोपीस चुन्नाभट्टी पोलिसांनी अटक केली. दुपारी बारा वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ काळे, स्वप्निल डमरे, पोलीस हवालदार पाटणे, पोलीस शिपाई अमोल यमगर हे परिसरात गस्त घालत होते. चुन्नाभट्टी येथील रेल्वे पटरीजवळील स्वदेशी मिल रोड, गेट क्रमांक दोनजवळ पोलिसांनी संशयास्पद फिरणार्या रेहानला ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक मॅगझीन सापडले.
तपासात रेहान हा वांद्रे येथील ज्ञानेश्वरनगर परिसरात राहत असून तो चुन्नाभट्टी येथे पिस्तूलची विक्रीसाठी आला होता. या पाचही आरोपीविरुद्ध पोलिसांनी घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करुन त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात या आरोपींनी इतर राज्यातून संबंधित घातक शस्त्रे मुंबईत विक्रीसाठी आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे.