पाच वेगवेगळ्या घटनेत आठजणांवर प्राणघातक हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत आरोपींना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 मार्च 2025
मुंबई, – शहरात पाच वेगवेगळ्या घटनेत क्षुल्लक कारणावरुन आठजणांवर त्यांच्याच परिचित आरोपींनी प्राणघातक हल्ला केला होता. जखमीपैकी सहाजणांवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी जुहू, धारावी, शाहूनगर, भांडुप आणि शिवाजीनगर पोलिसांनी पाच स्वतंत्र हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत सात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर दोन अल्पवयीन आरोपी मुलांची डोंगरीतील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
वृषभ राजेश ढोले हा विलेपार्ले येथे राहतो. शुक्रवारी रंगपंचमी खेळून तो त्याचा मित्र अनिकेत कटे याच्यासोबत बालवाडी पटांगण, नवतरुण मित्र मंडळाजवळ बसले होते. यावेळी दहा ते पंधराजणांचा एक गटातील तरुण दोघांना मारहाण करत होते. त्यामुळे त्याच्यासह त्याच्या मित्रांनी त्यांच्या भांडणात मध्यस्थी करुन त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने तरुणाच्या या गटाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात वृषभ आणि अनिकेत हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या मुकेश कोलंजी पेरुमल आणि बाळकृष्ण तडीकरण हरिजन या दोघांना पोलिसांनी अटक केली.
दुसरी अशीच घटना धारावी परिसरात घडली. जिलाजीत प्रेमशंकर जयस्वाल हा विमा एजंट धारावी परिसरात राहतो. शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता आंबेडकर मैदानात त्याचा परिचित राजकुमार सरोज आणि अमान शेख यांच्यात भांडण सुरु होते. त्यांच्यातील भांडण सोडविण्यासाठी जिलाजीत गेला होता. त्याचा राग आल्याने अमानने त्याच्यावर झाडांची कुंडी फेंकून मारली. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हल्ल्यात जखमी झालेल्या जिलाजीतवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. ही माहिती मिळताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याच गुन्ह्यांत बॉक्सर असलेल्या अमान आसिफ शेख याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर हत्येचा प्रयत्नाच्या गुन्ह्यांत कारवाई करण्यात आली आहे. अमान हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विनयभांगसह इतर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तिसर्या घटनेत मोबाईलवरुन शब्बीर करीम शेख याच्यावर सातजणांच्या टोळीने लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी वाजिद अकबर शेख आणि जावेद अकबर शेख या दोन बंधूंना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत जुनेद, शम्मी, गुल्लेश, अब्बू आणि रईस या पाचजणांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. शब्बीर हा गोवंडी परिसरात राहतो. काही दिवसांपूर्वी त्याने शम्मीचा मित्राकडून एक मोबाईल घेतला होता. हा मोबाईल बंद पडल्याने त्याने त्याच्याकडे मोबाईलच्या पैशांची मागणी केली होती. याच कारणावरुन शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता त्यांच्यात वाद झाला होता. यावेळी शम्मीसह इतर सहाजणांनी शब्बीरवर लोखंडी रॉडने हल्ला केला होता. त्यात गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सातपैकी दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.
माटुंगा येथे चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीची छेड काढणार्या तरुणांना जाब विचारला म्हणून या तरुणांनी दोन बंधूंवर दारुच्या बॉटल, चाकू आणि दगडाने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात ते दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच एका सतरा वर्षांच्या मुलाला शाहूनगर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला डोगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले. या गुन्ह्यांत दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. 19 वर्षांचा तक्रारदार तरुण माटुंगा येथे राहतो. त्याच्या चौदा वर्षांच्या बहिणीने आरोपीची शिटी वाजवून, अश्लील इशारे करुन छेड काढली होती. त्यामुळे तक्रारदार तरुण त्याच्या भावासोबत आरोपी तरुणांना जाब विचारण्यासाठी गेले होते. यावेळी या आरोपींनी जिवे मारण्याच्या उद्देशाने यादोघांवर दारुची बॉटल, दगड आणि चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात ते दोघेही गंभीर जखमी झाले होते. ही माहिती मिळताच शाहूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
भांडुप येथील पाचव्या घटनेत दिलीप शर्मा या व्यक्तीवर त्यांच्याच परिचित तिघांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच एका अल्पवयीन मुलासह महेश राम तंगडपल्ली याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या मुलाला डोंगरी सुधारगृहात पाठविण्यात आले तर महेशला अटकेनंतर स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्हयांत उमेश राम तंगडपल्लीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री पावणेनऊ वाजता भांडुप येथील शिंदे मैदानाजवळील श्रीराम चाळीत घडली. याच परिसरात दिलीप शर्मा हे राहत असून शुक्रवारी रात्री क्षुल्लक कारणावरुन तिन्ही आरोपींनी त्यांच्यावर तलवारीने वार केले होते. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी दिलीप शर्माच्या अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता.
या पाचही घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.