पाच विविध कारवाईत ड्रग्ज तस्करीप्रकरणी सातजणांना अटक
दिड कोटीचे एमडी ड्रग्जसहीत कोडेन फॅस्फेट बॉटल्स जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 एपिल 2025
मुंबई, – मुंबई शहरात गेल्या सात दिवसांत पाच विविध कारवाईत गुन्हे शाखेच्या अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या वांद्रे, वरळी, कांदिवली आणि घाटकोपर युनिटने सातजणांना अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी सुमारे दिड कोटीचे 541 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्जसहीत 840 कोडेन फॅस्फेट बॉटल्सचा साठा जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई शहरात ड्रग्ज तस्करी करणार्या आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना काहीजण ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर रविवारी 13 एप्रिलला वांद्रे युनिटच्या विशेष पथकाने वडाळा परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना 302 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले होते. या एमडी ड्रग्जची किंमत 90 लाख 60 हजार रुपये इतकी आहे.
अशाच दुसर्या घटनेत या पथकाने 7 एप्रिलला घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, छेडानगर जंक्शन परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून दोन तरुणांना अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी 840 कोडेन फॉस्फेटमिश्रीत बॉटलचा साठा जप्त केला. या बॉटलची किंमत 4 लाख 20 हजार रुपये इतकी आहेत. तिसर्या कारवाईत वरळी युनिटच्या अधिकार्यांनी एका तरुणाला 86 ग्रॅम वजनाच्या एमडी ड्रग्जसहीत अटक केली. त्याची किंमत 21 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. तो वरळी परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आला होता, मात्र ड्रग्ज विक्री करण्यापूर्वीच त्याला गस्त घालणार्या विशेष पथकाने शिताफीने अटक केली.
अन्य एका कारवाईत घाटकोपर पोलिसांनी वाडीबंदर परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी पंधरा लाखांचे 75 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. पाचव्या आणि शेवटच्या कारवाईत कांदिवली युनिटच्या अधिकार्यांनी गुरुवारी 10 एप्रिलला 78 ग्रॅम वजनाच्या एमडी ड्रग्जसहीत एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून जप्त केलेल्या एमडी ड्रग्जची किंमत 15 लाख 60 हजार रुपये इतकी आहेत.
अशा प्रकारे मुंबई पोलिसांच्या अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, छेडानगर जंक्शन, वडाळा पूर्व, वाडीबंदर आणि वरळी परिसरातून पाच कारवाई करुन सात आरोपींना अटक केली होती. या आरोपींकडून 541 ग्रॅम वजनाचे एमडी आणि 840 कोडेन फॉस्फेटमिश्रीत बॉटल्स असा सुमारे दिड कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सातही आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.