फ्लॅट बुकिंगच्या तेरा कोटीचा अपहार करुन ६८ जणांची फसवणुक
अंधेरीतील घटना; कंपनीच्या मुख्य आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ जुलै २०२४
मुंबई, – अंधेरीतील विरा देसाई रोडवर सुरु असलेल्या इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट बुकिंगसाठी घेतलेल्या तेरा कोटीचा अपहार करुन ६७ फ्लॅटधारकाची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रायझेस आणि एमएनपी असोशिएटचे मालक आणि संचालक जितेंद्र ब्रम्हभट्ट ऊर्फ जितूभाई बारोट याच्याविरुद्ध आंबोली पोलिसांनी अपहारासह फसवणुक आणि महाराष्ट्र मालकी फ्लॅट अधिनियम कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यांत जितेंद्र ब्रम्हभट्ट याची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अमजद आदम अरबानी हे व्यवसायाने व्यापारी असून त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील विरा देसाई, कंट्री क्लबसमोरील आर एव्हेन्यू अपार्टमेंटमध्ये राहतात. जितेंद्र ब्रम्हभट्ट हा बिल्डर असून तो प्रायझेस आणि एमएनसपी असोशिएटचा संचालक आहे. त्याच्या कंपनीने अंधेरीतील विरा देसाई रोडवर एका इमारतीचे प्रोजेक्ट सुरु होते. या प्रोजेक्टची माहिती समजल्यानंतर मे २००६ साली त्यांनी जितेंद्रची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्याने त्यांना त्यांच्या इमारतीमध्ये फ्लॅटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. प्राईम लोकेशनवर ही इमारत असल्याने त्यांनीही त्यांच्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी साडेबावीस लाख धनादेशद्वारे तर ४५ लाख रुपये कॅश स्वरुपात देऊन फ्लॅट बुकिंग केले होते. त्यांच्यासह इतर काही लोकांनी तिथे फ्लॅट बुकिंग केले होते. काही लोकांकडून जितेंद्र ब्रम्हभट्टने अतिरिक्त वीस टक्क्यापेक्षा रक्कम घेतले होते. त्यानंतर या सर्वांसोबत कंपनीचा करार झाला होता. या करारानंतर काही फ्लॅटचे अलोटमेंट देण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने इमारतीचे बांधकाम पूर्ण केले नाही. वारंवार विचारणा करुनही जितेंद्र ब्रम्हभट्टकडून त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला जात होता. अमजद अरबानी यांनी केलेल्या चौकशीदरम्यान जितेंद्र ब्रहमभट्टने फ्लॅट बुकींगच्या नावाने ६८ जणांकडून १३ कोटी ५ लाख ७३ हजार रुपये घेतल्याचे समजले होते. मात्र त्यापैकी कोणालाही फ्लॅटचा ताबा दिला नव्हता.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच या फ्लॅटधारकांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक शाखेत जितेंद्र ब्रहमभट्टविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या सांगण्यावरुन आंबोली पोलिसांनी जितेंद्रविरुद्ध ४०६, ४०९, ४२० भादवी सहकलम ३, ५, ८, १३ महाराष्ट्र मालकी फ्लॅट (बांधकाम विक्री, व्यवस्थापन आणि हस्तांतरण प्रचाराचे नियम) अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंतच्या चौकशीत जितेंद्र फ्लॅट बुकींगच्या नावाने तेरा कोटीची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले, मात्र ही फसवणुक तेरा कोटीपेक्षा अधिक असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे जितेंद्रची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.