फ्लॅटच्या १.७६ कोटीचा अपहार करुन महिला बिल्डरची फसवणुक
वयोवृद्ध महिलेविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ डिसेंबर २०२४
मुंबई, – फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन गृहकर्जाच्या परतफेडीसाठी दिलेल्या १ कोटी ७६ लाख रुपयांचा अपहार करुन एका महिला बिल्डरची फसवणुक झाल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मिनी जोसेफ वरीकेसरी या वयोवृद्ध महिलेविरुद्ध माटुंगा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत तिची पोलिसाकडून लवकरच चौकशी होणार आहे.
विरल मयंक गोगरी ही महिला व्यवसायाने बिल्डर असून ती तिच्या कुटुंबियांसोबत माटुंगा येथील तिसरी गल्ली, स्वामी नारायण मंदिरजवळील वात्सल्य सहकारी सोसायटीमध्ये राहते. त्यांच्याच शेजारी जोसेफ व त्यांची पत्नी मिनी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होते. तिथे त्यांचा स्वतच्या मालकीचा एक फ्लॅट आहे. अठरा वर्ष शेजारी राहत असल्याने त्यांच्यात कौटुंबिक संबंध होते. सप्टेंबर २०२१ रोजी जोसेफ व मिनी हे त्यांच्या घरी आले होते. त्यांनी त्यांना त्यांच्या फ्लॅटची विक्री करायची आहे असे सांगून फ्लॅट किंमत १ कोटी ७६ लाख रुपये असल्याचे सांगितले होते. त्यामुळे विरल गोगरी यांनी तो फ्लॅट त्यांच्याकडून विकत घेण्याचे ठरविले होते. या फ्लॅटवर एका खाजगी बँकेचे गृहकर्ज होते. त्यामुळे कर्जाची परतफेड केल्यानंतर त्यांनी तिला फ्लॅट त्यांच्या नावावर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून विरल गोगरी हिने त्यांना सप्टेंबर २०२१ ते १७ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत १ कोटी ७६ लाख रुपये दिले होते. पेमेंट केल्यानंतर त्यांनी त्यांना फ्लॅटचा ताबा दिला होता.
दोन महिन्यांत सेल ऑफ ऍग्रीमेंट रजिस्ट्रेशन करु सांगून वरीकेसरी कुटुंबिय तेथून दुसरीकडे राहण्यासाठी निघून गेले होते. मात्र दोन महिन्यानंतर त्यांनी ऍग्रीमेंटचे रजिस्ट्रेशन केले नाही. याच दरम्यान त्यांच्या घरी बँकेचे अधिकारी आले होते. त्यांनी त्यांना फ्लॅटवर गृहकर्ज असून या फ्लॅटवर लवकरच जप्तीचे कारवाई होणार असल्याचे सांगितले. ही माहिती ऐकून विरल गोगरी यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी या दोघांनाही कॉल केला असता त्यांनी फ्लॅटच्या पैशांतून कर्जाची परतफेड न करता वैयक्तिक कामासाठी वापर केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांनी बँकेचे गृहकर्जाची परतफेड करुन फ्लॅटचे कागदपत्रे स्वतकडे घेतले होते. त्यासाठी तिने एका खाजगी बँकेतून दोन कोटीचे रुपयांचे कर्ज घेतले होते. हा फ्लॅट त्यांना सुमारे चार कोटींना पडला होता.
चौकशीदरम्यान मिनी हिने लोअर परेल येथे एक फ्लॅट घेतला होता. उर्वरित रक्कम तिने तिच्या मुलांच्या शैक्षणिक आणि इतर कामासाठी केला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे त्यांच्या पैशांसाठी तगादा लावला होता. मात्र त्यांनी त्यांना पैसे परत केले नाही. जून २०२४ रोजी जोसेफ वरीकेसरी यांचे निधन झाले होते. अशा प्रकारे जोसेफ आणि त्यांची पत्नी मिनी वरीकेसरी यांनी फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांतून कर्जाची परतफेड न करता या पैशांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन विरल गोगरी यांची १ कोटी ७६ लाख रुपयांची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी माटुंगा पोलिसांत या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जोसेफ यांचे निधन झाल्याने मिनी वरीकेसरी हिची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.