फ्लॅटच्या पैशांच्या अपहारप्रकरणी वॉण्टेड आरोपीस अटक
फ्लॅटचे बोगस कागदपत्रे देऊन ताबा न देता पलायन केले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 मे 2025
मुंबई, – फ्लॅटसाठी दिलेल्या सुमारे 24 लाखांचा अपहार करुन एका वयोवृद्ध महिलेची फसवणुक करुन पळून गेलेल्या आरोपीस मालाड पोलिसांनी अटक केली. राजा पलनीस्वामी नयनार असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. फ्लॅटचे बोगस कागदपत्रे देऊन सहा महिन्यांत फ्लॅट ताबा देतो असे सांगून राजा हा पळून गेला होता, मात्र गुन्हा दाखल होताच त्याला काही दिवसांत पोलिसांनी अटक केली.
60 वर्षांची तक्रारदार महिला मालाडच्या सोमवार बाजार परिसरात राहते. याच परिसरातील मार्क फॉईल या दुकानात ती कामाला असून तिचे दोन्ही मुले खाजगी कंपनीत कामाला आहेत. सध्या तिच्या सासूच्या घरी ाहत असून तिथेच तिचे दिर तिच्या कुटुंबियांसोबत राहतात. दुकानात काम करताना तिची राजा नयनारशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने तो एसआरएमध्ये एजंट म्हणून काम करत असून तिला एसआरएचा फ्लॅट स्वस्तात देण्याचे आश्वासन दिले होते.
काही दिवसांनी त्याने तिला मालाडच्या नर्सिंग लेन, गावदेवी रहिवाशी संघात एक फ्लॅट असल्याचे सांगून तो फ्लॅट तिच्या नावावर करतो असे सांगितले. यावेळी त्यांच्यात फ्लॅटच्या खरेदी-विक्रीबाबत तीस लाखांमध्ये व्यवहार झाला होता. तिच्याकडे स्वतचा फ्लॅट नव्हता आणि मालाडमध्ये एसआरएमध्ये स्वस्तात फ्लॅट मिळत असल्याने तिने फ्लॅट घेण्याची तयारी दर्शविली होती. जून 2023 ते मे 2024 या कालावधीत तिने त्याला टप्याटप्याने 24 लाख रुपये दिले होते. उर्वरित रक्कम फ्लॅटच्या कागदपत्रांसह ताबा दिल्यानंतर देण्याचे ठरले होते.
ही रक्कम मिळाल्यानंतर त्याने सहा महिन्यांत तिच्या नावावर कागदपत्रे बनवून देण्यासह ताबा देण्याचे मान्य केले होते, मात्र सहा महिने उलटूनही त्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही. तसेच त्याने फ्लॅटचे दिलेले कागदपत्रेही बोगस होते. हा प्रकार नंतर तिच्या लक्षात आला होता. त्यामुळे तिने हा व्यवहार रद्द करुन त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांचा अपहार करुन तिची फसवणुक करुन पलायन केले होते. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध मालाड पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला गुरुवारी मालाड येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.