मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 सप्टेंबर 2025
मुंबई, – म्हाडा फ्लॅटच्या बदल्यात दुसरा फ्लॅट तसेच इतर तिघांना फ्लॅटमध्ये गुंतवणुक करुन चांगला फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आयएनएस हमलाच्या एका पेंटरसह त्याच्या भावासह इतर नातेवाईकांची सुमारे 99 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी एका मुख्य आरोपीस गोरेगाव पोलिसांनी अटक केली. पंकज रमाकांत झा असे या आरोपीचे नाव असून तो स्वतला म्हाडा एजंट असल्याचे सांगतो. या गुन्ह्यांत पंकजची पत्नी बबीता पंकज झा सहआरोपी असून तिची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. पोलीस कोठडीनंतर पंकजला लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अजीत राघोबा वराडकर हे गोरेगाव येथील नागरी निवारा परिषद येथे राहत असून सध्या आयएनएस हमलामध्ये पेंटर म्हणून कामाला आहे. जानेवारी 2019 साली त्यांना म्हाडाच्या सोडतीत गोरेगाव येथील सिद्धार्थनगर, फॉच्युन हाईट्स सोसायटीमध्ये एक फ्लॅट लागला होता. त्याची किंमत 56 लाख 34 हजार रुपये इतकी होती. त्यातील 25 टक्के म्हाडामध्ये भरणे आवश्यक असल्याने त्यांनी 14 लाख 58 हजार 525 रुपयांचे पेमेंट केले होते. उर्वरित रक्कमेसाठी ते एका खाजगी बँकेतून गृहकर्ज घेणार होते. मात्र बँकेत चौकशी केल्यानंतर त्यांना 42 लाख 50 हजाराच्या कर्जावर 33 हजार रुपयांचा मासिक हप्ता पडणार असल्याचे सांगण्यात आले. ते कर्ज फेडणे परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी फ्लॅट म्हाडा सरेंडर करण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान त्यांची त्यांच्या मित्रामार्फत पंकज झा याच्याशी ओळख झाली होती. त्याने त्यांना तो म्हाडाचा एजंट असल्याचे सांगून त्यांचा फ्लॅट त्याला विकण्याचा सल्ला दिला.
पाच वर्ष त्यांच्या नावावर फ्लॅटचे रजिस्ट्रेशन होत नसल्याने त्यांनी त्यांना पॉवर ऑफ अॅटर्नी देण्यास सांगितले. त्यानंतर त्याने त्यांना बँकेतून गृहकर्ज काढून त्याचे मासिक हप्ते आपण भरणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांच्यात फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा 76 लाखांमध्ये सौदा झाला होता. ठरल्याप्रमाणे पंकज आणि बबीता यांनी त्यांना 24 लाख 75 हजार रुपये दिले होत. त्यानंतर त्यांनी त्यांच्या फ्लॅटचे पॉवर ऑफ अॅटनी बबीता झा हिच्या नावावर करुन तिला फ्लॅटचा ताबा दिला होता.
याच दरम्यान पंकजने त्यांना फ्लॅटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत त्यांना गोरेगाव येथील उन्नतनगर येथे दुसरा फ्लॅट स्वस्तात देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्यासह त्यांचा भाऊ प्रशांत राघोबा वराडकर याला वडाळा, मामेबहिणमनाली शिलकर आणि निलेश मुणगेकर यांनाही फ्लॅटचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 99 लाख 31 हजार रुपये घेतले होते. मात्र कोणालाही फ्लॅट दिला नाही. तसेच त्यांच्या म्हाडा फ्लॅटचे नियमित हप्ते न भरता त्यांच्यासह त्यांच्या बँकेची फसवणुक केली होती. त्याच्याकडे पैशांची मागणी करुनही त्याने त्यांना पैसे परत केले नाही किंवा फ्लॅटचा ताबा दिला नाही.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच अजीत वराडकर यांनी पंकज झा आणि त्याची पत्नी बबीता झा या दोघांविरुद्ध गोरेगाव पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत सात महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या पंकज झा याला पेालिसांनी अटक केली. पोलीस कोठडीनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.