एमएमआरडीएच्या तोतया वॉण्टेड इंजिनिअरला दिड वर्षांनी अटक
फ्लॅटच्या आमिषाने अठरा लाखांची फसवणुक केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 एप्रिल 2025
मुंबई, – जोगेश्वरी येथे सुरु असलेल्या एमएमआरडीए इमारतीमध्ये स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका वयोवृद्धाची सुमारे 18 लाख रुपयांची फसवणुक करुन पळून गेलेल्या एका वॉण्टेड आरोपी रमेश बाळू वाघचौरे ऊर्फ रमेश पाटील याला दिड वर्षांनी एमएचबी पोलिसांनी अटक केली. रमेशने तो एमएमआरडीएमध्ये इंजिनिअर असून त्याच्याच ओळखीतून फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले होते. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यांत गणेश रतन सोनावणे हा सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रमेश शंकर लाड हे 62 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार बोरिवली येथे राहत एलआयसीमधून निवृत्त झाले आहेत. गणेश हा त्यांच्या परिचित असून ते त्याला गेल्या सहा वर्षांपासून ओळखत होते. तो म्हाडा एजंट म्हणून काम करत असल्याने त्याची म्हाडामध्ये चांगली ओळख आहे. याच ओळखीतून त्याने अनेकांना म्हाडा आणि एमएमआरडीएचे स्वस्तात फ्लॅट दिल्याचे त्यांच्या मेहुण्याने त्यांना सांगितले होते. याच दरम्यान गणेशने त्यांना जोगेश्वरी येथे एमएमआरडीएच्या एका इमारतीचे काम सुरु असून या इमारतीमध्ये त्यांना स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगितले होते. वन रुम किचनचा फ्लॅट 30 लाखांचा असून त्यांना तोच फ्लॅट 28 लाखांचे देण्याचे मान्य केले होते.
याच फ्लॅटसाठी त्यांनी गणेशसह त्याचा सहकारी रमेश वाघचौरे याला टप्याटप्याने 26 लाख 50 हजार रुपये दिले होते. रमेश हा एमएमआरडीएमध्ये इंजिनिअर असून त्याच्याच मदतीने त्यांना हा फ्लॅट मिळणार आहे असे सांगितले होते. मात्र दोन वर्ष उलटूनही त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. त्यानंतर त्यांनी त्यांना साडेआठ लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित अठरा लाख रुपये परत न करता या पैशांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी म्हाडाचा एजंट गणेश सोनावणे आणि एमएमआरडीएचा तोतया इंजिनिअर रमेश वाघचौरे याच्याविरुद्ध एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. गेल्या दिड वर्षांपासून रमेशचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना अखेर त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत होता. पोलीस कोठडीची मुदत संपताच त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या टोळीने अशा प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते.