फसवणुकीच्या गुन्ह्यांतील पार्टनर आरोपीस एक वर्षांनी अटक
फ्लॅटच्या नावाने फुल विक्रेत्याची केली 20 लाखांची फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
22 जून 2025
मुंबई, – फ्लॅटच्या बहाण्याने एका फुल विक्रेत्याची सुमारे 20 लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या एका वॉण्टेड पार्टनर आरोपीला एक वर्षांनी मालाड पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. आसिफ मकसूद खान असे या आरोपी पार्टनरचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहेत. या गुन्ह्यांत त्याच्यासोबत प्रशांत मधुसुदन गिरणीकर ऊर्फ विशाल किशोर तोंडपे, राजेश जाधव ऊर्फ योगेश चंदूलाल कमानी आणि जावेद खान असे तिघेजण सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिवकुमार रामनाथ गुप्ता हा फुल विक्रेता असून ते त्याच्या कुटुंबियांसोबत जोगेश्वरी येथे राहतात. त्यांना त्यांच्या कुटुंबियासाठी एक फ्लॅट घ्यायचा होता. जून 2023 साली ते मालाड येथील येथील एका मॉलमध्ये गेले होते. तिथे त्यांना राजेश जाधव याच्या हॅप्पी होम्स नावाच्या प्रॉपटी डिलर कार्यालयाची जाहिरात दिसली होती. त्यामुळे ते कार्यालयात गेले होते. त्यांनी राजेशशी फ्लॅटविषयी चर्चा केली होती. यावेळी त्याने अंधेरी येथे चार फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले होते. त्यापैकी एका फ्लॅटमालकाला पैशांची गरज आहे. त्यामुळे त्यांना तोच फ्लॅट स्वस्तात मिळवून देतो असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून ते त्याच्यासोबत अंधेरीला फ्लॅट पाहण्यासाठी गेले होते.
अंधेरीतील डी. एन नगर, स्विसहाईट टॉवरमध्ये आणल्यानंतर त्याने त्यांना विसाव्या मजल्यावरील 2001 क्रमांकाचा फ्लॅट दाखविला होता. हा फ्लॅट प्रशांत गिरणीकर याच्या मालकीचा असून त्याचीही त्याने भेट घडवून आणली होती. फ्लॅट आवडल्याने त्यांनी तोच फ्लॅट विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी राजेशला वीस लाख रुपये कॅश स्वरुपात दिले होते. यावेळी तिथे प्रशांत गिरणीकर व त्याचे दोन पार्टनर आसिफ खान आणि जावेद अन्सारी हे उपस्थित होते. पेमेंट झाल्यानंतर त्यांना रजिस्ट्रेशन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र एक आठवडा होऊन राजेशने फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करुन दिले नव्हते. तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे ते त्याच्या मालाड येथील कार्यालयात गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना कार्यालय बंद असल्याचे दिसून आले.
ऑगस्ट 2023 रोजी त्यांना राजेश भेटला, तो त्याचे कार्यालय दुसर्या ठिकाणी शिफ्ट करत होता. त्याला फ्लॅटसह पैशांबाबत विचारणा केल्यानंतर त्याने त्यांनी दिलेले 20 लाख रुपये आम्ही चौघांनी आपसांत वाटून घेतले आहे. त्यामुळे त्यांना फ्लॅट मिळणार नाही आणि फ्लॅटसाठी दिलेले पैसे परत करणार नाही असे सांगून त्याने त्यांना निघून जाण्यास सांगितले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच शिवकुमार गुप्ता यांनी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बोगस फ्लॅटमालक प्रशांत गिरणीकर, प्रॉपटी डिलर राजेश जाधव, त्याचे पार्टनर आसिफ खान आणि जावेद खान यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच चारही आरोपी पळून गेले होते, त्यामुळे त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना एक वर्षांपासून वॉण्टेड असलेला राजेशचा पार्टनर मित्र आसिफ खान याला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांतील इतर वॉण्टेड आरोपींच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.