विक्री केलेल्या फ्लॅटची खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन फसवणुक

75 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी मुख्य आरोपीस अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 डिसेंबर 2025
मुंबई, – सोशल साईटवर फ्लॅट विक्रीची जाहिरात प्रसिद्ध करुन फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन फ्लॅटची दुसर्‍या व्यक्तीला विक्री करुन सुमारे 75 लाखांची फसवणुक कटातील एका मुख्य आरोपीस गोरेगाव पोलिसांनी अटक केली. रविंद्र भीमराव बाली असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कटात त्याचे तीन सहकारी अमीत दुबे, जय सोलंकी आणि प्रविण हे सहआरोपी असून गुन्हा दाखल होताच ते तिघेही पळून गेले आहेत. त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

गणेश रमेश हातीम विलेपार्ले येथील सहारगावात राहत असून प्रवासी बोटीवर कामाला आहेत. त्यांना मुंबईत स्वतचे फ्लॅट घ्यायचे होते, त्यासाठी त्यांचे प्रयतन सुरु होते. याच दरम्यान त्यांना युनिक होम या सोशल साईटवर एका फ्लॅटची जाहिरात दिसली होती. विलेपार्ले येथील पार्क रोड, कमलेश मॅन्सन्स अपार्टमेंटमध्ये हा फ्लॅट होता. त्यामुळे त्यांनी या जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. यावेळी समोरील व्यक्तीने त्यांना त्यांच्या गोरेगाव येथील टोपीवाला माकेटजवळील कार्यालयात बोलाविले होते. 11 मार्च 2025 रोजी ते काव्या रियल्टी नावाच्या एका कार्यालयात गेले होते. तिथे अमीत दुबे, जय सोलंकी आणि रविंद्र बाली हे तिघेजण होते.

यावेळी अमीतने त्यांना जय सोलंकीशी ओळख करुन देताना त्यांच्या मालकीचा तो फ्लॅट असल्याचे सांगितले होते. त्यांनी त्यांना फ्लॅटचे सर्व दस्तावेजासह सोसायटीचे शेअर प्रमाणपत्र, जय सोलंकी यांच्या नावाचे लाईटबिल तसेच सोसायटीची एनओसी दाखविली होती. चर्चेअंती त्यांच्यात फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा 75 लाख 85 हजार रुपयांमध्ये ठरला होता. फ्लॅटचे दस्तावेज पाहिल्यांनतर त्यांना त्यांच्यावर विश्वास बसला होता. त्यामुळे त्यांनी त्यांना एक लाखांचा टोकन देऊन फ्लॅट बुक केला होता. काही दिवसांनी गणेश हातीम यांनी या तिघांनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यात 63 लाख 85 हजार रुपये ट्रान्स्फर केले तर कॅश स्वरुपात बारा लाख रुपये असे एकूण 75 लाख 85 हजार रुपये दिले होते.

या पेमेंटनंतर त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात रजिस्टेशननंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले होते. मात्र रजिस्ट्रेशनसाठी वारंवार कॉल करुनही ते तिघेही त्यांना प्रतिसाद देत नव्हते. हा प्रकार संशयास्पद वाटताच गणेश हातीम हे विलेपार्ले येथील पार्क रोड, कमलेश मॅन्सन्स अपार्टमेंटमध्ये गेले होते. त्यांनी जय सोलंकी यांच्या फ्लॅट क्रमांक दहाची सोसायटीच्या पदाधिकार्‍यांकडे चौकशी केली. यावेळी या पदाधिकार्‍यांनी त्यांना जय सोलंकीने त्याचा फ्लॅट दिपक कोलगे याला विक्री केल्याचे समजले. या माहितीने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी अमीत दुबेला कॉल करुन त्याला जाब विचारला होता,

मात्र त्याने त्यांचा कॉल बंद करुन ब्लॉक केला होता. सोशल साईटवर फ्लॅट विक्रीची जाहिरात देऊन या आरोपींनी त्यांच्यासोबत फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा केला आणि फ्लॅटची आधी दुसर्‍या व्यक्तीला विक्री करुन त्यांची 75 लाख 85 हजाराची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी गोरेगाव पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अमीत दुबे, प्रविण, जय सोलंकी आणि रविंद्र बाली या चौघांविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना रविंद्र बाली याला पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांनी एकाच फ्लॅटसाठी इतर काही लोकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page